ताज्या बातम्यानांदेडनायगांव

रामतीर्थ पोलीसांच्या नाकावर टिच्चून ओव्हरलोड वाळूची दिवसरात्र वाहतूक : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बघ्याची भुमिका

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : अंदाज समिती पाठ फिरवताच वाळू माफीयांचा उच्छाद सुरु झाला असून लाल वाळूची ओव्हरलोड वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. नरसी व आदमपूर भागातून दिवसरात्र रामतीर्थ पोलीसांच्या नाकावर टीच्चून ओव्हरलोड वाळूची वाहतूक सुरु असल्याने या अवैध प्रकाराला कुणाचे अभय मिळत आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी पानेगावकर यांना हा प्रकार दिसत नाही का ?

रामतीर्थ पोलीस ठाणे अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे. अवैध धंद्याच्या वसुलीतून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ठाण्यातील एका अधिकाऱ्याला जेरबंद केले होते. त्यानंतर काहीतरी फरक पडेल असा वाटत होते पण नरसी परिसरात वेश्या व्यवसाय फोफावला आहे. चार दिवसापूर्वी बिलोलीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने कारवाई करत सहा परप्रांतीय मुलींची सुटका केली.

अवैध धंदे बंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कितीही आदेश दिले तरी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे ठाणेदार मात्र आदेशाला कचरा कुंडी दाखवून आपले अर्थिक हित साधण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः अवैध वाळू विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अतिशय आक्रमक भुमिका घेतलेली असताना इथे मात्र पुर्णतः मोकळीक आहे. 

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नरसी व आदमपूर भागातून दररोज ओव्हरलोड लाल वाळूची शेकडो वाहणे जातात.  मात्र तीन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर अंदाज समिती आल्यामुळे लाल वाळूची अवैध व ओव्हरलोड वाहतूक बंद होती. परंतु दि. 10 एप्रिल पासून रोजी संध्याकाळी समिती जाताच पुन्हा वाळू माफीयांचा उच्छाद सुरु झाला.

दोन दिवसापासून ओव्हरलोड वाळूची शेकडो वाहणे दिवसरात्र सुसाट जात आहेत. नरसी चौक हा वर्दळीचा असला तरी हायवा चालकांना कशाचेही देणेघेणे राहीलेले नाही. दर महिण्याला मोदकांचा प्रसाद देण्यात येत असल्याने रामतीर्थ पोलीस बघ्याची भुमिका घेत आहेत. 

काही दिवसापूर्वी नायगाव पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांनी ओव्हरलोड वाळूच्या दोन वाहणावर कारवाई केली होती. पण नंतर पुन्हा वाहतूक सुरु झालेली असताना ते ही मौन बाळगले आहेत हे विशेष. 

नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे धाडसी कारवाई करणारे बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी नरसी चौकातून पोलीसांच्या नाकावर टिच्चून ओव्हरलोड वाळूची वाहतूक होत असतांना यांचा बानेदारपणा कुठे गेला अशी चर्चा सुरच झाली आहे.

नायगाव मुक्कामी राहून बिलोली उपविभागाचा कारभार बघणारे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर हे दररोज नायगाव बिलोली ये जा करतात पण ही ओव्हरलोड वाळूची वाहणे त्यांच्या नजरेतून सुटतात याचे आश्चर्य वाटत नाही.

अंदाज समितीने भेट दिल्यानंतर महसूल विभागाने आपला बानेदारपणा सगरोळीच्या वाळू घाटात विसर्जित केल्याचे उघड झाले आहे. मात्र जिल्हा पोलीस अधिक्षक व त्यांचे पथक बेधडक कायवाया करुन वाळू माफीयां कंबरडे मोडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतांना रामतीर्थ पोलीस मात्र वाळू माफीयांना पुरक धोरण राबवत असल्याने यांनी स्वाभिमान कुठे विसर्जित केला याची खमंग चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker