कुंटूरमध्ये ‘ड्राय डे’ला हरताळ; महाराष्ट्र दिनीच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री जोरात!
स्थानिक प्रशासन झोपेत, जनता मात्र त्रस्त; ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सिद्धार्थ गजभारे
कुंटूर : एकीकडे संपूर्ण राज्य १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करत असताना, नायगाव तालुक्यातील कुंटूर गावात मात्र या दिवसाच्या पावित्र्याला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. गावातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक ठिकाणी देशी व विदेशी दारूची अवैधरित्या सर्रास विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, ‘ड्राय डे’ असतानाही छुप्या मार्गाने होणारी ही विक्री पाहून स्थानिक प्रशासन नक्की झोपले आहे की याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाचा ‘भोंगळा’ कारभार चव्हाट्यावर
मागील अनेक वर्षांपासून कुंटूरमध्ये अवैध दारू विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. कारभार अत्यंत निष्क्रिय ठरत असून, अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. गावात जणू परवाना असल्यासारखी दारू विक्री सुरू आहे.
महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त आणि तपासणी अपेक्षित असताना, कुंटूर पोलिसांना हा प्रकार दिसत नाही का? हा आता चर्चेचा विषय बनला आहे. या गंभीर प्रकारामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. स्थानिक पोलिसांच्या या ‘मेहेरबानी’मुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने यात तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.
गावातील या परिस्थितीमुळे सामान्य जनता कमालीची त्रस्त झाली आहे. प्रशासनाने जर वेळीच या अवैध दारू विक्रेत्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. “प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जर तात्काळ ही अवैध विक्री थांबली नाही, तर जनता रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारेल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असेल.



