शासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून नायगाव तालुक्यात अवैध गुटखा विक्री

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : गुटख्यामुळे बरबाद होणारी युवा पिढीचा विचार करुन आणि सार्वजनिक आरोग्याच्या हेतून राज्यात सन २०१२ पासून राज्यात गुटखा बंदी करण्यात आली. मात्र हा बंदी आदेश झुगारून गुटखा माफीया सर्वच कंपण्याच्या गुटख्याची विक्री शासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून व राजरोसपणे करत आहेत. या अवैध गुटखा विक्रीला प्रचंड उत आला असतांना अन्न व औषध विभागाचे अधिकारी बघ्यांची भुमिका घेत आहे तर दुसरीकडे स्थानिक पोलीसांचे सुरक्षा कवच मिळत असल्याचे बोलल्या जात आहे.
महाराष्ट्र राज्यात, सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहित लक्षात घेता गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थावर २०१२ पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून अन्नसुरक्षा आयुक्त यांनी बंदी घातलेली आहे. त्यामुळे राज्यातील गुटखा निर्मिती करणाऱ्या कंपण्या राज्याबाहेर गेल्या. अलीकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरून मोठय़ा प्रमाणावर गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात आयात केली जाते.
त्यांची राज्यात साठवणूक होते. कधी कधी हा माल पकडलाही जातो व वाहनचालकांवर कारवाई होते, परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही त्यामुळे गुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही.
अवैध गुटखा विक्रीवर नियंत्रण आणता आले नसल्याने गुटखा बंदी कागदावरच राहीली ही वस्तुस्थिती असतांनाही आताचे सरकारही काटेकोर अंमलबजावणीसाठी काहीच हालचाली करतांना दिसत नाही. त्यामुळे नायगाव तालुक्यातील खेड्यापाडात व गल्ली बोळातील किराणा दुकान जनरल स्टोअर्स व पान टप-यावर राजरोसपणे व खुलेआम सर्वच प्रकारच्या गुटख्याची विक्री होत आहे.
गुटख्याच्या काटेकोर बंदीसाठी राज्यशासनच उदासिन असल्याने शासनाचा अन्न व औषध विभाग तर बेफिक्रच आहे. त्यामुळे पोलिस विभाग आपले खिसे भरण्याचे काम करीत असून गुटखा विक्री करणा-यांना चक्क सुरक्षाही पुरवत आहेत.
सध्या परिस्थितीत नायगाव तालुक्यात नांदेड शहरातून गुटखा टेंपो भरून येत असल्याने नायगाव तालुका होलसेल गुटख्याचे केंद्र तर नायगावच्या शेजारी असलेले कहाळा्यासह काही गावे गुटखा साठवण्याचे गोडावून झाले आहेत.
तेलंगाना व कर्नाटकातून देगलूर मार्ग आलेला गुटखा साठवण्यासाठी आणि नांदेड शहरातून नायगावपर्यंत पोहचणा-या गुटख्याच्या वाहणाला व नायगाव शहरासह तालुक्यात गुटखा विक्री करण्यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणाच संरक्षण पुरवत असल्याचे बोलल्या जात असून. येथील गुटखा माफीया तसे जाहीरपणे सांगतही आहेत. विशेष म्हणजे गुन्हे शाखेचा एक कर्मचारी या गुटखा माफीयाच्या सतत संपर्कात असतो असेही बोलल्या जात आहे.
सुरक्षा कवच मिळत असल्याने सर्वच नामांकित कंपण्याचा गुटखा तालुक्यासह नायगावात येत असून तो शहरातील पानपट्या, किराणा व काही जनरल स्टोअर्समधून होलसेल व किरकोळ दरात भेटत आहे. या गुटखा विक्रीची व्याप्ती एवढी मोठी झाली आहे की दर महीण्याला ५० ते ७५ लाखाची अर्थिक उलाढाल होत असल्याची माहीती मिळाली आहे. बंदी असलेला गुटखा विक्री एवढ्या बिनबोभाटपणे व उघड उघड विकल्या जात असतांना स्थानिक पोलिस यंत्रणा मात्र धृतराष्ट्राची भुमिका घेत आहे.
नायगाव तालुक्यातील कहाळा येथील तीन तालुक्याला गुटखा पुरवणाऱ्या माफीयाला कुंटूर पोलीसांचे कवच असून. आय जी च्या पथकानेही या गुटखा माफीयाकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कहाळा येथील गुटखा माफीया बिनदिक्कतपणे व पोलीसांच्या नाकावर टिच्चून विक्री करत आहे.
नांदेड शहरातून पुरवठा
नायगाव तालुक्यातील कहाळा येथील त्या गुटखा माफीयाला नांदेड शहरातूनच मोठ्या प्रमाणात गुटख्याचा पुरवठा होत असतो. तीन तालुक्याला पुरवण्यात येणारा गुटखा नांदेड शहरातूनच येत असेल तर स्थानिक गुन्हे शाखा व आय जी चे पथक आणि पोलीस यंत्रणा काय करते असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.



