नायगाव महसूल विभागाचा पुढाकार: ८ मे रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन
प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार ; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

अंकुशकुमार देगांवकर
नायगाव :- नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा सुलभरीतीने मिळाव्यात आणि शासकीय कार्यालयांचे हेलपाटे थांबावेत, या उदात्त हेतूने महसूल विभागातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. नायगाव महसूल विभागाच्या पुढाकाराने हे अभियान शुक्रवार, ८ मे रोजी सकाळी १०:०० वाजता नायगाव येथील तहसील कार्यालयाशेजारील बहुउद्देशीय सभागृहात पार पडणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन तक्रारींचे निवारण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी मंडळ स्तरावर या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे.
शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा व सुविधा:
या शिबिराच्या माध्यमातून खालील महत्त्वाचे प्रश्न निकाली काढले जाणार आहेत:
७/१२ व ८-अ उतारा: डिजिटल स्वाक्षरीच्या उताऱ्यांचे वाटप आणि ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती.
दाखले व प्रमाणपत्रे: उत्पन्न, रहिवासी, जातीचे दाखले आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे.
जमीन सुधारणा: प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ई-मोजणी अर्ज, भूसंपादन व अकृषिक (N.A.) परवानगी प्रकरणांचा निपटारा.
योजनांचा लाभ: ॲग्रीस्टॉक, पी.एम.किसान नोंदणी आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे.
मार्गदर्शन: अकृषिक तरतुदींबाबत सुधारणा, ‘सनद’ प्रक्रिया आणि घरांसाठी पट्टे वाटप याबाबत मार्गदर्शन.
या विशेष अभियानासाठी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे आणि तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
“या अभियानामुळे प्रलंबित असलेले फेरफार निकाली निघणार असून, अभिलेख दुरुस्ती आणि लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.”
— सुधाकर इज्जपवार (मंडळ अधिकारी, नायगाव)
नायगाव परिसरातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांसाठी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



