नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे धाडसी चोरी; दीड लाखांची नगदीसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

प्रकाश महिपाळे
नायगाव : नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे काल रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका घरात अज्ञात चोरांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरांनी घरातील सदस्यांवर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध केले आणि अंदाजे पावणे तीन तोळे सोने, अर्धा किलो चांदी आणि दीड लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबी येथील रहिवासी साईनाथ गणपती पोतलवाड यांच्या घरी ही चोरी झाली. घटनेच्या वेळी घरातील काही सदस्य वरच्या मजल्यावर झोपले होते, तर काही जण बाहेर गेले होते. एका भावाच्या लग्नानिमित्त घरात नवीन जोडपे देखील होते, जे कुलरच्या आवाजामुळे दुसऱ्या खोलीत झोपले असल्याने त्यांना घटनेचा सुगावा लागला नाही.
चोरांनी घरात प्रवेश करून खाली झोपलेले घरमालक गणपती पोतलवाड आणि प्रदीप पोतलवाड यांच्या तोंडावर बेशुद्धीचा स्प्रे मारला आणि घरातील मौल्यवान ऐवज लंपास केला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आणखीन एका ठिकाणी दुकान फोडण्याची घटना घडली. जवळच असलेल्या गोदमगाव येथून एक मोटरसायकल चोरली असल्याची माहिती समोर येत आहे.
चोरीला गेलेला अंदाजीत मुद्देमाल: नगद रक्कम: अंदाजे ₹१,५०,०००/- (दीड लाख रुपये), सोन्याचे दागिने: दोन अंगठ्या, कानातले झुमके आणि लग्नात भेट मिळालेल्या ५-५ ग्रॅमच्या अंगठ्या (एकूण अंदाजे पावणे तीन तोळे सोने), चांदीचे दागिने: मुलांचे वाळे, दंड साखळ्या व इतर वस्तू (अंदाजे अर्धा किलो चांदी).
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी सध्या नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे कोलंबी आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



