बिजूर येथील शिवनेरी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

मोरे मनोहर
किनाळा :- सन 2026 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या शिष्यवृत्ती परीक्षेत बिजूर तालुका बिलोली येथे सुरुवात करण्यात आलेल्या शिवनेरी पोतदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी इयत्ता पाचवी चे पाच विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे दोन विद्यार्थी हे शिष्यवृत्तीस घवघवीत यश मिळवले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले असल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत पुन्हा एकदा भर पडली असल्याने विद्यार्थी व पालकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शंकरनगर पासून जवळच असलेल्या बिजूर येथील शिवनेरी पोतदार लर्न स्कूलचे पहिल्याच वर्षी इयत्ता पाचवीचे 31 विद्यार्थी व इयत्ता आठवीचे 12 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यापैकी इयत्ता पाचवीचे 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले तर इयत्ता आठवीचे 2 विद्यार्थी पहिल्याच वर्षी घवघवीत यश संपादन करत शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
शिवनेरी पोतदार लर्न स्कूल या शाळेची पहिल्याच वर्षी दमदार सुरुवात झाली असून शाळेतील एक विद्यार्थी पहिल्याच वर्षी जवाहर नवोदय विद्यालयास पात्र ठरला तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवी चे पाच आणि आठवीचे दोन असे एकूण सात विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत विद्यार्थ्यांच्या या सुयशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठी भर पडली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शंकरनगर हे शिक्षणाचे माहेरघर असून येथे जवाहर नवोदय विद्यालय, संत ज्ञानेश्वर विद्यालय, श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय याबरोबरच भास्करराव बापूराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल, सावित्रीबाई फुले इंग्रजी स्कूल असून येथे जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असताना शंकरनगर परिसरात याहीपेक्षा दर्जेदार शिक्षण देण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शंकरनगर पासून जवळच नांदेड देगलूर राज्य महामार्गावर बिजूर जवळ सुरुवात करण्यात आलेल्या शिवनेरी पोतदार लर्न या सी बी एस सी इंग्रजी माध्यमांच्या शाळेने दमदार विद्यार्थी घडवण्यासाठी सुसज्ज इमारत व तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विशेष परिश्रम घेत असल्याने शाळेचे नाव अल्पावधीतच नावारूपाला येत असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व सभासद मंडळ तसेच शाळेचे प्राचार्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.



