तरुणाचा बळी गेला, तरी बिलोली प्रशासन ढिम्मच! मांजरा नदीतील अवैध रेती उपसा रोखण्यात तहसीलदार अन् SDM अपयशी ; माफियांचा की राजकीय दबाव?
जिल्हा उपाध्यक्ष माधवराव पटने यांचा प्रशासनाला जाहीर इशारा; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा भडका उडणार!

प्रकाश महिपाळे
नांदेड :- बिलोली तालुक्यातील मांजरा नदीच्या पात्रातून अव्याहतपणे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रभर प्रशासनाच्या नाकाखाली नियमांची ऐशीतैशी करत लाखो ब्रास वाळूचा उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणाचा पद्धतशीरपणे गळा घोटला जात असून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, अवघ्या पाच दिवसांपूर्वी याच अवैध वाहतुकीमुळे ‘सगरोळी’ येथील एका निष्पाप तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
तरीही बिलोलीचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी (SDM) ढिम्मच हलण्यास तयार नाहीत. त्यामुळे “हा सरकारी कारभार आहे की वाळूमाफियांची मनमानी?” असा संतप्त सवाल आता तालुक्यातील जनतेने थेट विचारण्यास सुरुवात केली आहे.
जनता दल (सेक्युलर) चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष श्री. माधवराव लालप्पा पटने यांनी गेल्या ३० एप्रिल २०२६ रोजीच लेखी तक्रार दिली होती. त्यांनी बिलोलीचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, बिलोली पोलीस ठाणे तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक (SP) यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदने सुपूर्द केली होती. या तक्रार पत्रांवर शासकीय आवक-जावकचे शिक्के मारून २० दिवस उलटले, वर्तमानपत्रांतून रोज बातम्या प्रसिद्ध झाल्या, तरीही स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
प्रशासनाच्या याच कुंभकर्णी स्वरूपाच्या दुर्लक्षामुळे अखेर पाच दिवसांपूर्वी एका तरुणाचा बळी गेला. या मृत्यूला पूर्णपणे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी हेच जबाबदार असल्याचा थेट आरोप आता स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे.
ओव्हरलोड हायवा आणि टिपर्सचा सुसाट हैदोस गंजगाव, हुनगुंदा आणि बोळेगाव परिसरातून अहोरात्र ओव्हरलोड वाहने सुसाट वेगाने धावत आहेत, ज्यामुळे सामान्य वाहनधारकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
अपघातांचे सत्र या वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेती सांडत असल्याने रस्ते घसरडे झाले असून दुचाकीस्वारांचे अपघात रोजचे झाले आहेत. उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या डोळ्यांचे आजार वाढले आहेत.
पर्यावरणाचा विनाश नदीपात्रातील बेसुमार उपशामुळे भविष्यात भीषण जलटंचाई आणि भूजल पातळी घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे वरिष्ठ पातळीवर अंदाज समितीच्या पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. लेखी तक्रारी, वृत्तपत्रांमधील बातम्या आणि प्रत्यक्ष एका नागरिकाचा बळी गेल्यानंतरही जर पोलीस आणि महसूल प्रशासन शांत बसून असेल, तर यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? अधिकाऱ्यांना वाळूमाफियांचे मूक संरक्षण आहे की राजकीय दबाव? अशा शंकांनी आता जोर धरला आहे.
मांजरा नदीचे अस्तित्व आणि सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले असताना संबंधित अधिकारी अजून किती काळ मौन बाळगणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जर पुढील काळात या अवैध रेती उपशावर पूर्णपणे बंदी घालून, दोषी वाहनांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झाली नाही, तर जनता दल (सेक्युलर) आणि बिलोली तालुक्यातील त्रस्त जनतेच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र लोकशाही आणि कायदेशीर आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट आणि रोखठोक इशारा जिल्हा उपाध्यक्ष माधवराव पटने यांनी दिला आहे.
आता पाहायचे हे आहे की, एका तरुणाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येते की अधिकारी अजूनही कुणाच्या तरी दबावाखाली वाळूमाफियांचे ‘लाड’ पुरवणे सुरूच ठेवतात! आता तरी नांदेडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन बिलोलीतील या ‘रेती साम्राज्याला’ सुरुंग लावणार की माफियांचे भले पाहत राहणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



