“प्रियदर्शनी ग्लोबल स्कूलची अनुष्का बेंद्रीकर ठरली शाळेची मानकरी!”
दहावी बोर्ड परीक्षेत 95.80 टक्के गुणांची चमकदार कामगिरी; संचालक मंडळाकडून सत्कार

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत प्रियदर्शनी ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी अनुष्का बालाजी बेंद्रीकर हिने 95.80 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेच्या संचालक मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी अनुष्का हिचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला तिचे वडील बालाजी बेंद्रीकर, आई मीनाक्षी बेंद्रीकर, शाळेचे संचालक आकाश मादसवार, मुख्याध्यापिका वर्षा कंठे मॅडम, शिक्षक व सर्व शालेय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनुष्का हिच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि पालक-शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना अनुष्काने व्यक्त केली.
शाळेच्या संचालक मंडळाने तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.



