अखेर लोकशाही अन् सत्याचा विजय! जिल्हा बँक निवडणुकीसाठी कुंडलवाडी सोसायटीतून डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब
विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय; हुकूमशाही व नियमबाह्य निवड करणाऱ्या विरोधकांना जोरदार चपराक

कुंडलवाडी : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी कुंडलवाडी सोसायटीकडून मतदान प्रतिनिधी पाठवण्याचा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला हायव्होल्टेज राजकीय ड्रामा अखेर संपुष्टात आला आहे. लातूरचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी विरोधकांची नियमबाह्य निवड रद्द ठरवत, विशेष सर्वसाधारण सभेत कायदेशीररीत्या निवड झालेले माजी उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीत डॉ. कुडमुलवार यांच्याच नावाचा समावेश होणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून, हुकूमशाही व नियमबाह्य पद्धतीने निवड करू पाहणाऱ्या विरोधकांना हा मोठा कायदेशीर झटका मानला जात आहे.
कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून जिल्हा बँकेसाठी प्रतिनिधी पाठवण्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या. नियमबाह्य बैठक: ८ एप्रिल रोजी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन, ‘ज्येष्ठ संचालक’ असे कोणतेही पद अस्तित्वात नसताना संचालक गंगाधर खेळगे यांनी एक बैठक बोलावली आणि गजानन कोटलावार यांची प्रतिनिधी म्हणून निवड केली.
चेअरमनचे सडेतोड उत्तर: या हुकूमशाही व नियमबाह्य निवडीला आव्हान देत सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी १० एप्रिल रोजी सोसायटीच्या प्रांगणात अधिकृत विशेष सर्वसाधारण सभा बोलावली. या सभेत बहुमताने माजी उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांची अधिकृत मतदान प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. न्यायालय ते सहनिबंधक कार्यालय:
चेअरमननी स्वतः लढवली बाजू!
सहायक निबंधक बिलोली यांनी याप्रकरणी विभागीय सहनिबंधकांकडे पाठवलेल्या अभिप्रायाविरुद्ध विरोधकांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी लातूरच्या विभागीय सहनिबंधकांना कायद्यानुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार १५ मे रोजी लातूर येथे अंतिम सुनावणी झाली. यावेळी गंगाधर खेळगे यांच्या वतीने वकील राजा वीर यांनी बाजू मांडली, तर कुंडलवाडी सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी स्वतः वकिलीची भूमिका निभावत कायद्याच्या चौकटीत विरोधकांचा प्रत्येक युक्तिवाद खोडून काढला.
अंतिम निकाल: सत्य आणि कायदेशीर बाजूचा विजय!
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी २५ मे रोजी अंतिम निकाल दिला. त्यांनी गंगाधर खेळगे यांनी घेतलेली नियमबाह्य बैठक आणि गजानन कोटलावार यांची निवड पूर्णपणे रद्द ठरवली. तर चेअरमन बेजगमवार यांनी घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेतील डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांची निवड वैध ठरवली.
उद्या कुंडलवाडीत भव्य जल्लोष व विजयी सभा
या कायदेशीर आणि ऐतिहासिक विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शुक्रवार, दिनांक २९ मे रोजी कुंडलवाडी येथे भव्य जल्लोष आणि विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
”कुंडलवाडी सोसायटीकडून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर योग्य व पात्र मतदार प्रतिनिधी म्हणून डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांची निवड झाली आहे. ‘ज्येष्ठ संचालक’ पद कायद्यात नसतानाही हुकूमशाही पद्धतीने निवड करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला असून त्यांना जोरदार चपराक बसली आहे. सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी व हितासाठी आम्ही यापुढेही कटिबद्ध राहू.” — सुनील बेजगमवार (चेअरमन, कुंडलवाडी सोसायटी)
“माझी मतदान प्रतिनिधी म्हणून झालेली निवड ही कायदेशीर व लोकशाही मार्गाने झाली आहे. विरोधकांनी हुकूमशाही पद्धतीने केलेली निवड उच्च न्यायालय व विभागीय सहनिबंधक या दोन्ही ठिकाणी अमान्य झाली असून, दोन्ही ठिकाणी विरोधकांचे पारिपत्य (पानिपत) झाले आहे. हा सत्याचा विजय आहे.” — डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार (नवनियुक्त मतदान प्रतिनिधी व माजी उपनगराध्यक्ष)



