डी.एम.जाधव कुष्णुरकर सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न

नायगाव / भगवान शेवाळे
शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठेने व कर्तव्यभावनेने सेवा बजावणारे श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल, कहाळा येथील डी. एम. जाधव सर कृष्णुरकर यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा रविवारी (३१ मे) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जाधव यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मोहनराव पा. सुगावकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव माधवराव पा. वाळकीकर, सहसचिव श्रीहरी पा. उबाळे, नायगाव खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, माजी प्राचार्य गो. श. मेथे, विलास पाटील मेथे, पप्पू पाटील, मनोज मोरे, पप्पू कोंढेकर, विठ्ठल पावडे, श्रीहरी देशमुख, पंढरीनाथ कमठेवाड गुरुजी, माधवराव शिंदे गुरुजी, परबत पाटील जाधव, प्रशांत नादरे (सरपंच), डांगे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डी. एम. जाधव यांच्या प्रदीर्घ सेवाकाळाचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक कार्याची, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पित वृत्तीची आणि संस्थेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. शिक्षक म्हणून त्यांनी जपलेली कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समाजासमोर ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साखरे सर यांनी केले. सूत्रसंचालन शिवराज जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मुआ शेळके सर यांनी केले. शेवटी उपस्थितांनी डी. एम. जाधव यांना निरोगी, आनंदी व यशस्वी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.



