नायगाव तालुक्यात 68 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत 9 ते 11 जून दरम्यान : तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांचे सुधारित आदेश

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : राज्यातील २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व २०२६ मध्ये कालबद्ध होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नायगाव खै. तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत दि. ९, १० व ११ जून रोजी होणार आहे. तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी दि. ५ जुन रोजी सुधारित आदेश काढले आहेत.
तालुक्यातील प्रभाग रचना पूर्ण झालेल्या ६८ ग्रामपंचायतींसाठी १४ मंडळ अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती. त्यांना संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक सहाय्यक म्हणून काम पाहतील. दि. ९ जून ते ११ जून दरम्यान सकाळी ११ वाजता व दुपारी २ वाजता अशा दोन सत्रात गावनिहाय सोडत काढण्यात येणार आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण करून परिशिष्ट १ ते ९, परिशिष्ट १० व अनुसूची नमुना-ब दि. १२ जुन रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात स्वतः उपस्थित राहून सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
सोडतीसाठी नेमलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक दि. ८ जुन रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय नायगाव खै. येथे आयोजित केली आहे. बैठकीस विनापरवानगी गैरहजर राहू नये. सदर कामी निष्काळजीपणा/हयगय झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.



