ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शंभर कोटीच्या नायगाव कुंटूर रस्ता कामाच्या तक्रारीची महामंडळ दखल घेईना : खासदार आमदारांचेही मौन, उलटसुलट चर्चा

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : राज्य रस्ता क्रमांक २६४ नायगाव ते उमरी 29 किलोमीटरच्या कामासाठी 100 कोटीचा खर्च करण्यात येत आहे. पण ‘राज सेतू’ ही कंत्राटदार कंपणी सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून काम अतिशय सुमार दर्जाचे करत आहे. सदरील कामाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या असून या तक्रारीची महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने तर दखल घेतलीच नाही पण या भागाचे खासदार आणि आमदारांनीही सोईस्कररित्या मौन बाळगले असल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघातील राज्य रस्ता क्रमांक 264 इपीसी एनडी – II (33अ) उमरी, तळेगाव, बळेगाव, इकळीमाळ, कुंटूर व नायगाव या 29 किलोमीटरच्या रस्त्याचे काम मागच्या वर्षी मंजूर झाले. नायगाव मतदारसंघात नायगाव व उमरीला जोडाणारा राज्य रस्ता हा अतिशय महत्वाचा आहे. मात्र या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे राज्य सरकारने या 29 किलोमीटरच्या दोन पदरी रस्ता करण्याच्या कामासाठी जवळपास 100 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या या रस्त्यासठी एवढा मोठा निधी पहील्यांदाच शासनाने उपलब्ध करुन दिल्याने काम दर्जेदार होईल असे नागरिकांना वाटत होते परंतु या रस्त्याचे काम करणाऱ्या ‘राजसेतू’ कंपणीने अतिशय सुमार दर्जाचे काम करत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत.

होत असलेल्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाची आहे. महामंडळाच्या एकाही जबाबदार अधिकाऱ्याने तक्रारीची दखल घेवून साधी तपासणी केली नाही. उलट सुमार दर्जाचे काम करणाऱ्या ‘राजसेतू’ला बळ देण्याचेच काम केलेले आहे. ‘राज सेतू’ च्या अर्थिक ओझ्याखाली दबलेल्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तर या रस्ता कामाकडे पाठ फिरवलेलीच असताना राजकीय नेत्यांनीही दखल घेतली नाही. नायगावचे भुमिपूत्र असलेले खा.रवींद्र चव्हाण यांनीही याबाबत मौन बाळगले आहे तर सत्ताधारी भाजपचे आमदार राजेश पवार यांना त्यांचे कार्यकर्ते कार्यसम्राट आमदार म्हणतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात या कामाच्या तक्रारी होत असतांना ते इकडे चक्करही मारली नसून त्यांनीही सोईस्कररित्या मौन बाळगले आहे.

या दोन्ही खासदार आणि आमदारांनी होत असलेल्या सुमार दर्जाच्या कामाबाबत कानावर हात आणि तोंडावर बोट ठेवल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker