ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगांव शहरात मुरूम माफियाचा ‘हौदोस ‘ ; रात्रीचा खेळ कोणाच्या ‘आशीर्वादाने’ ?

तहसील परिसरासह अनेक ठिकाणी अवैध मुरूमाचे ढिगारेच… ढिगारे

सय्यद जाफर

नायगांव :- नायगांव शहरात मुरूम माफियांचा ‘नंगा नाच’ सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून महसूल विभागाच्या ‘अलिखित सेटलमेंट’ मधून जागो जागी मुरूमाचे ढिगारे आढळून येत आहेत. चिरीमिरीचा दर ठरला आणि अवैध उत्खनन व वाहतुकीला ‘राजमान्यता’ मिळाली. त्यामुळे शहरात जागोजागी ‘अवैधरित्या मुरूमाचे ढिगारे ‘ उभी राहिली आहेत. हे सर्व प्रकार बिनधास्त पणे चालू असताना यावर आता कार्यवाही कोण करणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नायगांव शहरात आणि इतरत्र ठिकाणी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत डंपर, हायवे शहरात सुसाट धावत आहेत. पोलीस आणि महसूलचे गस्ती पथक मात्र ‘गाढ झोपेत’ आहेत. कारण ‘हप्ता’ वेळेवर पोहोचत असल्याची चर्चा होत आहे तोंडी परवानगी, अलिखित सहमती आणि याच्या जोरावर महसूल विभागाने सरळ – सरळ माफियांना ‘लायसन्स’ दिले की काय ? अशी चर्चा जोरदारपणे होत आहे. महसूल विभाग मुरूम माफियांचा ‘हस्तक’ बनला आहे की काय ? असा सवाल आता रस्त्यावर चर्चिला जात आहे.

नायगांव शहरात रात्रीला मांजरम व गोदमगाव शिवारातुन अवैध मुरूमाचे उत्खनन बिनधास्त जोमात होत आहे. महसूल यंत्रणा या माफियांना मुग गिळून सहमती देत असल्याचे बोलण्यात येत आहे. तहसील कार्यालयासमोर असलेल्या मोठ्या पटांगणात मुरूमाचे मोठं मोठे ढिगारे हे चोरीच्या मुरूमाचे पुरावे देत आहेत. तर हैद्राबाद – नांदेड महामार्गावरील मुख्य रस्त्यालगत बांधकाम होत असलेल्या जागेवरही मोठ मोठे मुरूमाचे ढिगारेच ढिगारे उभे राहिले आहेत. याचा अर्थ काय ? हे रोखण्यासाठी कार्यवाही कोण करणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत.

पर्यावरणाच्या दृष्टीनेही अनियंत्रित मुरूम उत्खनन गंभीर मानले जाते. यामुळे शेती, नैसर्गिक जलप्रवाह आणि भूजल पातळीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणप्रेमींकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker