ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड: विसावा उद्यान परिसरातील अनधिकृत चौकाचा फलक हटवा; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील विसावा उद्यान परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर काही अज्ञात घटकांनी विनापरवाना अनधिकृत फलक लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच परिषदेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतराव मारोती पाटील वनाळेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विसावा उद्यानाच्या पूर्व-उत्तर दिशेकडील जागेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य स्मारक व पुतळ्याचे काम कायदेशीर मान्यता आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या भूमिपूजनानंतर सुरू आहे. परंतु, या कामाच्या अगदी समोरील भागात काही अज्ञात खोडसाळ घटकांनी प्रशासकीय परवानगी न घेता सिमेंट काँक्रीटचा पाया घालून एका वेगळ्याच चौकाचा बोर्ड उभारला आहे.

या अनधिकृत फलकामुळे परिसरात सामाजिक शांतता ढळण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेऊन सदर अनधिकृत फलक हटवावा आणि संबंधित खोडसाळ समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी हनुमंतराव पाटील वनाळेकर यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती विशेष पोलीस महानिरीक्षक (नांदेड), जिल्हाधिकारी (नांदेड) आणि पोलीस अधीक्षक (नांदेड) यांनाही देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker