महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
माहूरगडचे राजकुमार' उत्कृष्ट नायब तहसीलदार!

माहूर : नांदेड महसूल विभागातील जिल्हाभरात विविध पदांवर काम करणारे अधिकारी,कर्मचाऱ्यांचा महसूल दिनाचे औचित्य साधून ‘उत्कृष्ट कर्मचारी’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.माहूर तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार तथा नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड यांना जिल्ह्यातून उत्कृष्ट नायब तहसीलदारचा बहुमान मिळाला आहे. दि. ८ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अप्पर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर, किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह महसूल विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांची कामे करताना अधिकारी-कर्मचारी यांची मानसिकता ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारी असली पाहिजे. विषयांच्या खोलात जाऊन अभ्यासपूर्ण रितीने काम केले तर लवकर प्रश्न मार्गी लावू शकतात. वस्तुनिष्ठपणे परिस्थिती हाताळली तर प्रश्न सुटून त्याचे समाधान मिळू शकते. परंतु हल्ली ‘दिन जाव, पैसा आव’ची प्रवृत्ती असल्याने निष्ठेने जनतेची कामे करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी दुर्मिळ झालेत.
त्यातूनच काही सेवाभाव वृत्ती जोपासणारे ‘उत्कृष्ट’ अधिकारी कर्मचाऱ्यांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातून उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून माहूरचे डॉ.राजकुमार गोविंदराव राठोड यांची निवड करण्यात आली. व तसेच उत्कृष्ट अवलकारकून म्हणून किनवट उपविभागीय कार्यालयातील के.डी.कांबळे, उत्कृष्ट महसूल सहाय्यक म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालयातीलच संतोष मुपडे,किनवट तहसीलचे नितीन शिंदे तर उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून माहूरचे पवन बेहरे यांनाही गौरविण्यात आले आहे.
माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी तातडीने पोहोचून बचाव कार्य सुरू केल्याबद्दल नायब तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
◼️डॉ.राजकुमार राठोड यांची उल्लेखनीय कामगिरी जुलै २०२३ मध्ये पुरामध्ये अडकलेल्या पाच लोकांचे प्राण एसडीआरएफच्या मदतीने वाचविले,नैसर्गिक आपत्ती अनुदान याद्या पारदर्शकतेने अपलोड केले. लोकसभा निवडणूक मध्ये उत्कृष्ट कामगिरी, जिल्हाधिकाऱ्यांचे अवैध गौण खनिज पथक प्रमुख म्हणून वाळू माफियांमध्ये खळबळ माजविणारी प्रभावी कारवाई केली.
पीएम किसान लँड सिडिंग पूर्ण करून नागरिकांच्या तक्रारीचे निरसन केले. देवभूमी माहूरचे मुख्याधिकारी म्हणून सलग दोन वर्षे यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला दरम्यान दत्त जयंती महोत्सव परिक्रमा यात्रा नवरात्र उत्सव अचूक नियोजन व अंमलबजावणी शिवाय तीर्थक्षेत्राला येणाऱ्या शासकीय पाहुण्यांचा राजशिष्टाचार देखील तितक्याच आदरतिथ्याने सांभाळला.
◼️वर्षभरात महसूल विभागातील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांचे,मेहनतीचे व त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लोकाभिमुख सेवेचे कौतुक करण्याचा महसूल दिवस हा एक कार्यक्रम आहे. या वर्षी महसूल दिन हा महसूल सप्ताह ऐवजी महसूल पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. कोणत्याही आपत्ती अथवा शासकीय उपक्रम, कार्यक्रम असो,प्रत्येक ठिकाणी सर्वात आधी महसूल विभाग पोचलेला असतो.
कोणत्याही काळात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या या कुटुंबाचा घटक म्हणून मला या विभागाचा अभिमान आहे. मा.जिल्हाधिकारी साहेब, मा.निवासी उपजिल्हाधिकारी साहेब व निवड समितीचे आभार. डॉ.राजकुमार राठोड
नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी, माहूर.