ताज्या बातम्यानांदेडबिलोली

आय जी च्या पथकाने बंद घाटावर केली कारवाई : पोलीस निरिक्षकांच्या ‘त्या’ पत्राने उलटसुलट चर्चेला उधाण

सगरोळी वाळू घाट कारवाई: आयजींच्या पथकाचा दणका की स्थानिक पोलिसांचे 'बचाव' पत्र? पोलीस निरीक्षकांच्या पत्राने चर्चेला उधाण

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : बिलोली तालुक्यातील सगरोळी घाटावरील कारवाई आता वेगळे वळण घेत असून बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दि. 22 रोजी तहसीलदारांना लिहीलेल्या पत्रामुळे झालेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात तर सापडलीच असून पोलीस निरिक्षकांनीच उपमहानिरीक्षकांच्या पथकाला उघडे पाडले कुजबूज सुरु झाली आहे.

दि. 21 मार्च रोजी सायंकाळी पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर कारवाई करत नियमबाह्य सुरु असलेल्या उत्खननावर कारवाई करत 36 हायवा व 8 पोकलेन ताब्यात घेतले होते आणि अशाच बातम्या अनेक वर्तमानपत्रात आलेल्या आहेत.

त्यामुळे एकीकडे आय जी च्या पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक होत होते तर दुसरीकडे महसूल आणि स्थानिक पोलीस यंत्रणेच्या खाबुगीरीवर जोरदार टिका होत होती. त्याचबरोबर महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी हे या कारवाईबद्दल नाखूष होते. ही सर्व चर्चा एकीकडे सुरु असताना हा खटाटोप अर्थिक कारणातून करण्यात आला अशीही ओरड सुरु झाली होती.

सगरोळी घाटावर झालेल्या कारवाईबाबत कौतुक, नाराजी आणि अर्थिक रंग देण्याचा प्रयत्न होत असतांना बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दि. 22 मार्च रोजी तहसीलदार बिलोली यांना एक पत्रा लिहिले असून त्या पत्रामध्ये दि. 21 मार्च रोजी सगरोळी घाटाची पाहणी केली असता घाट बंद असून यामध्ये 32 हायवा, 8 पोकलेन व एक ट्रक अशी वाहणे थांबलेली दिसून आली आहेत.

सदर वाहणाची वैद्यता आपल्या कार्यालयाकडून तपासणी होवून पुढील उचीत कारवाई होणेस विनंती केली आहे. या पत्राने आय जी च्या पथकाची कारवाई तर संशयाच्या भोवऱ्यात तर सापडलीच पण पथकालाही एकप्रकारे खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला आणि दुसरीकडे पुढील कारवाईचा चेंडू महसूल विभागाच्या दारात ढकलून मोकळे होण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे उघड उघड दिसून येत आहे.

बिलोलीच्या पोलीस निरिक्षकाने अशा प्रकारे पत्र कुणाच्या दबावाखाली दिले आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून जर राजकीय दबावाखाली येवून असे पत्र दिले असेल तर पोलीस विभागाचीच अब्रू घालवण्याचा प्रकार असल्याची आता चर्चा सुरु आहे.

सगरोळी वाळू घाटावर सुरू असलेला हा उघड-उघड हैदोस पथकाने ‘उघड्या डोळ्यांनी’ पाहिला आणि त्यावर आता मौन बाळगले जात असून, हे पोलीस यंत्रणेच्या प्रतिमेला जबरदस्त तडा देणारे आहे. जेव्हा एखादा जबाबदार अधिकारी गुन्ह्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा त्या ‘मौना’चे अनेक अर्थ निघतात. हे मौन कोणाच्या राजकीय दबावाखाली होते की कोणत्या ‘अर्थपूर्ण’ तडजोडीपोटी, याचे उत्तर आता जनतेला हवे आहे.

सगरोळी घाटात आय जी च्या पथकाने केलेल्या कारवाईत 36 हायवा दाखवल्या पण पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी लिहीलेल्या पत्रात 32 हायवा आणि एका ट्रकचा उल्लेख आहे त्यामुळे पकडलेल्या हायवाबाबत संभ्रम निर्माण झाला असून यात लपवाछपवी होत असल्याचे दिसत आहे.

पोलीस निरीक्षकांच्या या पत्राने आयजींच्या पथकाची कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आणली आहे. पथकाने प्रत्यक्ष उत्खनन सुरू असताना कारवाई केल्याच्या बातम्या असताना, स्थानिक पोलीस ‘घाट बंद होता’ असे सांगून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ही बाब वरिष्ठ पथकाला खोटे ठरवण्याचा आणि कारवाईचा चेंडू महसूल विभागाच्या कोर्टात ढकलून हात झटकण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker