दुचाकीची उभ्या ट्रालीला धडक : एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

New Bharat Times नेटवर्क
मुखेड : मुखेडवरुन मुक्रमाबादकडे निघालेल्या दुचाकी स्वाराने मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बिहारीपूर जवळ रोडच्या बाजूला उभे असलेल्या ट्रक्टरच्या ट्रालीला धडक दिली. यात पती पत्नीसह चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. २३ जुन रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुखेड तालुक्यातील परतपूर वस्तीवाढ येथील मोसीन गन्नीसाब शेख व पत्नी फरीदा मोसिन शेख व चार वर्षाचा मुलगा जुनेद मोशीन शेख हे तिघे गुरुवारी सकाळी बचतगटाचे काम असल्यामुळे मुखेडला गेले होते. तेथील सर्व काम संपल्यानंतर एम. एच 14 आर 0059 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून परतपूर गावाकडे निघाले होते. दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान बिहारीपुर नजीक राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला नादुरूस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रक्टर ट्राँलीला भरधाव वेगात धडक दिली.
यात शेख मोहसीन व त्याची पत्नी शेख फरीदा यांच्या डोक्याला व छातीला जबरदस्त मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या लहान मुलाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मोठी इजा झाल्याने त्याला उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. धडक एवढी जबरदस्त होती की, गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेली ट्राँली तीन फूट मागे सरकली.
सदरच्या अपघातानंतर मुक्रमाबाद,परतपुर या गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळीच्या बिहारीपुर गावातील स्थानिक रहिवाशांनी मदत केली असून या तिघांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रमाबाद येथे शवविच्छेदन करुन मयतांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मोसिन गण्णीसाब शेख यांच्या पश्चात आई, वडील, सात वर्षाची मुलगी, बहिन, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. राष्ट्रीय महामार्गावर दोन वर्षात अनेक तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.