उमरीतील चोरीची वाळू नायगाव तालुक्यात ; तहसीलदारासह महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

प्रकाश महिपाळे
नायगाव : महसूल प्रशासनाने नायगाव तालुक्यातील अवैध वाळू उपस्याला पायबंद घातला आहे. मात्र उमरी तहसीलदारांच्या मेहबानीने त्या भागातील गोदावरी नदीपात्रातून बिनधास्तपणे अवैध वाळूचा उपसा करुन ती नायगाव तालुक्यात विकल्या जात आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून माफीयाराज सुरु असतांना प्रशासन हतबल होवून बघ्याची भुमिका घेत आहे.

वाळू माफीयांनी नायगावसह उमरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करत होते. मात्र नायगाव तहसीलदारांनी सातत्याने कारवाया करुन गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाला पायबंद घातला असला तरी उमरी तहसीलदार मंजूषा भगत यांना मात्र आजपर्यंत कारवाई करण्यात यश आले नाही. उलट त्यांनी वाळू माफीयांच्या ताटाखालचे मांजर होवून मोकळीक दिली आहे. त्यामुळे उमरी तालुक्यात माती, मुरुम व वाळू माफीयांनी हैदोस घातला आहे.
काही दिवसापूर्वी नायगाव महसूल विभागाने बरबडा परिसरात गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या बोटी स्फोटके लावून उडवल्या आहेत. परंतु उमरी तालुक्यात तहसीलदार मंजूषा भगत यांच्या नाकावर टिच्चून माफीया सक्षण पंपाच्या सहायाने दिवसरात्र वाळूचा उपसा करत आहेत. उमरी तालुक्यात अवैध उपसा केलेल्या वाळूची रात्रीला चोरट्या मार्गाने नायगाव तालुक्यात विक्री करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे उमरी तालुक्यातील इज्जतगाव, कौडगाव, हस्सा यासह अनेक गावात गोदावरी नदी पात्रातून प्रचड वाळूचा उपसा सुरु आहे. दिवसरात्र सुरु असलेल्या अवैध वाळू उपस्याला आवर घालण्याचे धारिष्ट्य कुणातच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असताना तहसीलदारच बघ्याची भुमिका घेत असल्याने तलाठी व मंडळ अधिकारी वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत.
आपापल्या हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतूक निदर्शनास आपल्यास संबंधिताविरुध्द दंडात्मक, फौजदारी तसेच इतर अनुषंगिक कायदयानुसार कार्यवाही करण्यात यावी विशेषतः रात्रीच्या वेळी होणा-या वाहतूकीवर विशेष लक्ष ठेवून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकांनी दिलेले आहेत.
मात्र उमरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणारा वाळूचा उपसा पाहता उमरी तहसीलदार वाळू माफीयाना मोकळीक दिली की काय असेच वाटत आहे.



