कुणालाही विधानसभेत पाठवा पण विद्यमान आमदारला पुन्हा संधी देवू नका
चिखलीकरांच्या आभार सभेत कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती...

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना मताधिक्य मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या आ. राजेश पवार यांच्याबद्दल कार्यकर्त्यात मोठा असंतोष निर्माण झाला असून या असंतोषाला चिखलीकरांच्या आभार सभेत कार्यकर्त्यांनी वाट मोकळी केली. व्यासपीठावर बसलेल्या कुणालाही उमेदवारी द्या आम्ही रक्ताचे पाणी करुन साथ देवू पण विद्यमान आमदारला पुन्हा विधानसभेत पाठवू नका अशी कळकळीची विनंती करत आपला संताप कार्यकर्त्यांनी भर कार्यक्रमातच व्यक्त केला. आभार सभेचा मुड पाहता आ. पवार यांच्याबद्दल मतदारसंघात प्रचंड असंतोष असल्याचे दिसून आले.

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी सोमवारी नायगाव येथे आभार दौरा येथील साईतिर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या सभेला मारोतराव कवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार, श्रावण पाटिल भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, राजेश कुंटूरकर, माणिक लोहगावे, वसंत सुगावे, गंगाधर बडूरे, अशोक पाटील मुगावकर, देविदास बोमनाळे यांच्यासह अनेकांची उपस्थित होती.
लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांना आ. राजेश पवार मताधिक्य मिळवून देण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. याचा उद्रेक आभार दौऱ्यात होण्याचे संकेत मिळत होते आणि झालेही तसेच. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभवानंतरही अतिशय संयमाची भुमिका घेवून मीच कुठेतरी कमी पडलो त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे असे म्हणतातांनाच लोकसभेला जे झाल ते विधानसभेला होऊ देवू नका पक्षाने तो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. पण संतापाचा उद्रेक झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करतांना व्यासपीठावरील कुणालाही उमेदवारी द्या पण राजेश पवारांना पुन्हा विधासभेत पाठवू नका अशी कळकळीची विनंती करुन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
प्रताप पाटील चिखलीकरांच्या आभार सभेला महायुतीच्या पदाधिकाऱ्यासह अनेकांची उपस्थिती होती पण मारोतराव कवळे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. कारण मागच्या काही दिवसापासून कवळे हे महायुतीकडून उमेदवारीच्या चर्चेत आहेत.
आ.राजेश पवार हे सतत माझ्या संपर्कात होते आणि आहेत असे वक्तव्य दि. १६ जुन रोजी नांदेड येथे पत्रकारांशी, संवाद साधताना केल्यानंतरही दि. १७ जुनच्या आभार दौऱ्याकडे आ.पवार यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
मतदारसंघातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पण विद्यमान आमदार राजेश पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. चिखलीकरांना कमी पडलेल्या मताधिक्याचा जाँब कुणी विचारेल या धास्तीने आ. पवार यांनी पाठ फिरवली असल्याची सभास्थळी दबक्या आवाजात चर्चा होत होती.