पाटोदा( बु.) येथील के.एम.पाटील माध्यमिक विद्यालयातून दोन सीसीटीव्ही कँमे-यांची चोरी
◆अज्ञात चोरट्यांविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धर्माबाद :- तालुक्यातील पाटोदा (बु.) येथील के. एम.पाटील माध्यमिक विद्यालयात दि.२० जानेवारी रोजी रात्री शाळेच्या परिसरात बसवण्यात आलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे चोरीस गेल्याची घटना घडली असून याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पाटोदा( बु.) येथील के. एम.पाटील माध्यमिक विद्यालयात शासन निर्णयानुसार शाळेत व शाळेच्या परिसरात १८ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दि.२० जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी शाळेच्या मैदानातील निलगिरीच्या झाडावर लावलेला एक कॅमेरा व प्रयोगशाळा खोलीच्या स्लॅबवरील बीम वर लावलेला एक असे दोन सीपी प्लस बुलेट दोन कंपनीचे कॅमेरे किंमत १० हजार ४०० रुपयांचे चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी मुख्याध्यापक दत्तात्रय योगीराज शिंदे यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुरनं १६/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ सुनील पत्रे हे करीत आहेत. यापूर्वीही दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी शाळेतील मुख्याध्यापक कक्षा समोरील एक कॅमेरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.



