शासकीय जमीन अतिक्रमणाने पोखरलेली ‘मिनकी’ची सत्ता हादरली; ५ ग्रामपंचायत सदस्य ‘आऊट’!
जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निकाल; गायरान जमिनी हडपणाऱ्या गावपुढार्यांना मोठा दणका

सतिश बळवंतकर
बिलोली : ‘गावाचा विकास करू’ अशी शपथ घेऊन सत्तेत बसलेल्या लोकप्रतिनिधींनीच चक्क गावाच्या हक्काच्या ‘गायरान’ जमिनीवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिलोली तालुक्यातील मिनकी ग्रामपंचायतीच्या पाच महिला सदस्यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र घोषित केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील अतिक्रमण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक नागरिक खंडेराव लक्ष्मण सर्जे यांनी या प्रकरणी पुराव्यांसह प्रशासनाकडे दाद मागितली होती. सदस्यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा त्यांनी केला होता. या तक्रारीनंतर तहसील, पंचायत समिती आणि भूमी अभिलेख कार्यालयाने केलेल्या संयुक्त चौकशीत भ्रष्टाचाराचे हे ‘मोडस ऑपरेंडी’ उघड झाले. चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार, सदस्य आणि त्यांच्या पतींनी २००० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रावर बेकायदेशीर ताबा मिळवला होता. काही ठिकाणी तर सरकारी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून स्वतःची नावे घुसडल्याचेही निदर्शनास आले आहे.
शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या मिना वैजनाथ आउलवार,अनुसया भास्कर गायकवाड, यशोदाबाई पिराजी भंडारे, चंद्रकला आनंदराव बिरादार, गजराबाई हनुमंत बिरादार या पाच सदस्यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ (ज-३) चा दणका जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.शासकीय जमीन किंवा मालमत्तेवर अतिक्रमण करणारी व्यक्ती किंवा ज्यांच्या कुटुंबाने असे अतिक्रमण केले आहे, ती व्यक्ती पदावर राहण्यास अपात्र ठरते. याच कलमाचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या पाचही सदस्यांचे सदस्यत्व उर्वरित कालावधीसाठी रद्द केले आहे.
हा निकाल केवळ एका ग्रामपंचायतीपुरता मर्यादित नसून, सरकारी जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी हा ‘अलार्म’ मानला जात आहे. या ऐतिहासिक निकालामुळे बिलोली तालुक्यातील आगामी होणाऱ्या ग्रा.प. निवडणुकीचे चे राजकारण चांगलेच तापले जाणार असून, सत्तेत येणाऱ्या सरपंच सदस्यांनकडुन पारदर्शक कारभाराची अपेक्षा ग्रामस्थांकडुन व्यक्त केली जात आहे.



