सोनारीफाटा येथे उद्या रविवारी ९ व्या ‘बौद्ध धम्म परिषदे’चे आयोजन; मान्यवरांचा गौरव व प्रबोधनाचा जागर

New Bharat Times नेटवर्क
हिमायतनगर : – तालुक्यातील सोनारीफाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने उद्या रविवार, २९ मार्च रोजी एकदिवसीय ‘नववी बौद्ध धम्म परिषद’ उत्साहात संपन्न होणार आहे. या परिषदेत पूजनीय भंते यांची धम्मदेसना, मान्यवरांचे व्याख्यान, राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कारांचे वितरण आणि ख्यातनाम शाहिरांचे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
परिषदेचे उद्घाटन व प्रमुख उपस्थिती
या परिषदेचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर असतील, तर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येईल.
दिवसभराचे भरगच्च कार्यक्रम
- धम्मदेसना: पूजनीय भंते पय्यारत्न थेरो उपस्थितांना धम्मदेसना देतील.
- व्याख्यान: दुपारी १ वाजता प्रा. डॉ. जे. टी. जाधव आणि प्रा. डॉ. विजय गोणारकर यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान होईल.
- सांस्कृतिक कार्यक्रम: दुपारी २ वाजता बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम होईल, ज्यामध्ये भीमशाहीर माधव वाढवे, विकासराजा गायकवाड आणि इतर स्थानिक कलाकार सहभागी होतील.
- रात्रीचा जलसा: रात्री हिंगणघाटच्या स्वरादीदी तामगाडगे, सपनाताई खरात, धम्मानंद शिरसाठ आणि रवीराज भद्रे या सुप्रसिद्ध शाहिरांचा प्रबोधनपर कार्यक्रम रंगणार आहे.
’राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार’ वितरण
दुपारी ५ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार २०२५-२६’ देऊन सन्मानित करण्यात येईल. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, कमलबाई तलवारे, भारत खेलबाडे, अमोल भगत यांच्यासह २० हून अधिक मान्यवरांचा समावेश आहे.
या परिषदेला खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार भीमराव केराम यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष शेख रफिक, संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, प्रा. मोहन मोरे व संपूर्ण संयोजन समिती परिश्रम घेत आहे.
“या धम्म परिषदेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा मोठा विचार मांडला जाणार आहे. तरी परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे, अनिल मादसवार, डॉ.मनोज राऊत, प्रताप नरवाडे, राहुल लोणे, संघपाल कांबळे,डॉ.सारीपुत्र गोखले, शेख खय्युम, शाहीर नरेंद्र दोराटे, रमेश नारलेवाड, शाहीर सुभाष गुंडेकर, शिवाजी डोखळे, जळबा जळपते, नागनाथ वच्चेवाड, परमेश्वर वानेगांवकर, यशवंत थोरात, किरण वाघमारे, अविनाश कदम आदी परिश्रम घेत असून या परिषदेला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.



