“डिजिटल इंडियाचा नवा चेहरा? गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रात्री १२ ला रस्त्यावर अंथरुण टाकण्याची वेळ!”
"कडाक्याची थंडी आणि गॅसची प्रतीक्षा! महिला अन् वृद्धांची रात्र रस्त्यावरच; नायगावमधील वितरण व्यवस्थेचा बोजवारा."

प्रकाश महिपाळे
नायगाव :- एकीकडे प्रशासन जिल्ह्यात घरगुती गॅसचा मुबलक साठा असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे नायगावमध्ये मात्र ग्राहकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. शहरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी शेकडो नागरिकांना चक्क रात्रीच्या वेळी रस्त्यावर मुक्काम ठोकावा लागत आहे. थंडीची पर्वा न करता, रात्रभर रांगेत बसूनही सिलेंडर मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने सामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

प्रशासकीय दावे आणि जमिनीवरील वास्तव
जिल्हा प्रशासनाच्या दाव्यानुसार गॅस सिलेंडरची कमतरता नाही. मग प्रश्न उरतो की, नायगावच्या ‘इंडेन गॅस एजन्सी’समोर अशा रांगा का लागत आहेत? वितरण व्यवस्था कोलमडली आहे की, हा जाणीवपूर्वक केलेला ‘कृत्रिम तुटवडा’ आहे? रात्री १२:५० च्या सुमारास पाहिले असता, वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

रांगेत महिला आणि वृद्धांची गर्दी
विशेष चिंतेची बाब म्हणजे, या रांगेत केवळ पुरुषच नाही, तर मोठ्या संख्येने महिला आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतरही नागरिक रस्त्यावरच अंथरुण टाकून झोपलेले पाहायला मिळाले. भरवस्तीत आणि रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे रात्रभर थांबणे हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे.

शुक्रवारी मध्यरात्री १२:५० वाजेच्या सुमारास घेतलेल्या छायाचित्रांवरून हे स्पष्ट होते की, केवळ पुरुषच नाही तर अनेक महिलादेखील आपल्या कुटुंबासाठी गॅस मिळवण्यासाठी या रांगेत बसून होत्या. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी थंडीची पर्वा न करता रस्त्यावरच अंतरून टाकून रात्रीचा मुक्काम ठोकला आहे.

काळा बाजाराची शक्यता?
मुबलक साठा असूनही जर ग्राहकांना अशा प्रकारे ताटकळत राहावे लागत असेल, तर यामागे गॅस सिलेंडरचा काळा बाजार किंवा व्यावसायिक वापरासाठी होणारी बेकायदेशीर विक्री कारणीभूत आहे का? असा संशय आता नागरिक व्यक्त करत आहेत. मुबलक सिलेंडरचे वितरण नेमकं कुठे होतंय, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रशासकीय साठा मुबलक असताना सामान्य ग्राहकांना रात्रभर रस्त्यावर का बसावे लागते? गॅस एजन्सीच्या वितरण पद्धतीवर प्रशासनाचे नियंत्रण का नाही? गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामागे काळा बाजार करणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे का?
या भीषण परिस्थितीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करावी आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नायगावकर करत आहेत.



