अंचोली येथे आठ जुगाऱ्यांना अटक : सात लाखाचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मोबाइल लोकेशनवरुन विशेष पथकाने तालुक्यातील अंचोली येथे धाड मारुन आठ जुगाऱ्यांना पकडले आहे. रोख रक्कमेसह मोटारसायकल व कार असा सात लाख 28 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पण पथकाने रोख रक्कम कमी दाखवण्यात आली असल्याची चर्चा होत आहे. सदरची कारवाई दि. 28 रोजी सायंकाळी करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात येत असताना अनेक ठिकाणी लपूनछपून अवैध धंदे सुरुच आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या विशेष पथकाला नायगाव तालुक्यातील अंचोली येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती दि. 28 रोजी मिळाली आणि जुगार खेळणाऱ्या एका जुगाऱ्याचा नंबरही मिळाला. त्यामुळे या पथकाने मोबाइल नंबरच्या लोकेशनवरुन शोध काढत अंचोली गठली.
अंचोली ते रानसुगाव पांदन रस्त्यावर राजू मोरे यांच्या शेता जवळ लिंबाच्या झाडाखाली गजानन किशनराव पोतलवाड रा. कोलंबी, यादव महाजन पल्लेवाड रा. गोदमगाव, गंगाधर गुनाजी मेघळ रा. कहाळा, शेख रफीयोद्दीन लियाकत रा. कहाळा, शादूल मौलासाब शेख नरसी, दामाजी विठ्ठल पेंटेवाड रा. लालवंडी, सय्यद फिरोज करीमसाब रा. नायगाव व मोहन प्रकाश कदम रा. गोदमगाव अदि आठ जन जुगार खेळताना आढळून आले.
यावेळी रोख रक्कम 14 हजार 500 रुपये, मोबाईल, मोटारसायकल व कार असा एकूण 7 लाख 28 हजार 300 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आनंद वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तिर्रट नावाचा जुगार खेळणारे बडे धेंड होते त्यामुळे त्या ठिकाणी रोख रक्कम मोठ्या प्रमाणात होती. मात्र धाड मारलेल्या पथकाने रोख रक्कम कमी दाखवल्याची चर्चा होत असून. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ते पण एवढी कमी रक्कम दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करत आहेत.