बोळेगावच्या रोजगार सेवकाचा महाप्रताप… रोहयो योजनेतून तब्बल तीन कोटी अपहार केल्याचा आरोप.
अनेक लाभार्थ्यांची तक्रारी, तरीही गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- बिलोली तालुक्यातील मौ.बोळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत रोहयोच्या मध्येमातून करण्यात येत असलेल्या सार्वजनिक, वृक्ष लागवडीसह विविध कामात येथील ग्रामरोजगार साह्यक विठ्ठल एकंबे हा मस्टरमध्ये आपल्याचं कुटूंबातील व्यक्तीची नावे टाकून अनेक लाभार्थ्यांचे परस्पर लाखो रुपये हडप केल्याच्या ग्रापंकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा अनेक कामात तब्बल ३ कोटी रुपयांचे अपहार केल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सेवकास निलंबीत करण्यासाठी लेखी आदेश दिले, परंतु गटविकास अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे या वादाग्रस्त ग्रामरोजगार साह्यकावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.
येथील अकार्यक्षम ग्रामरोजगार साह्यक विठ्ठल एकंबे हा गेल्या काही वर्षांपासून रोहयोच्या माध्यमातून बोळेगाव ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या सार्वजनिक वृक्ष लागवड, सिंचन विहीर, पांदन रस्ते, शेततळे, घरकुलसह अनेक कामे प्रत्यक्षात न करता परस्पर आपल्याच कुटूंबातील व्यक्तीच्या नावे हजेरी मस्टरमध्ये भरून लाखो रुपये हडप केल्याचा बोळेगावच्या ग्रामस्थाकडून आरोप केला जात आहे.
दि. १९ व १४ सप्टेंबर रोजी चार घरकुल लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीत लाभार्थ्यांच्या परस्पर १ लाख १० हजार रुपये तर २२,२००, २५,२४५, २५,२४५ असे एकूण १ लाख ८२ हजार ४९० रुपये लाभार्थ्यांना न कळूदेता हडप केले. याबाबत बोळेगावच्या ग्रामपंचायतकडे दि. १४ सप्टेंबर रोजी लाभार्थ्यांकडून तक्रार दाखल कारण्यात आली. अशा अनेक तक्रारीमुळे दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत रोजगार सेवकास कामावरून निलंबीत करण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. परंतु कुठे काय माशी शिंकली की…? रोजगार जैसे थे कामावर रुजू आहे.
याबरोबर ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक वृक्ष लागवडीचे काम न करता जवळपास ३० लाख रुपये आणि आतापर्यंत रोह्योच्या विविध कामात आपले हित साधून तब्बल ३ कोटी रुपयाचा गैरव्याहार करून शासनाला चुन्ना लावला. याबद्दल दि. १९ सप्टेंबर रोजीच्या तक्रारीनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक, मगांराग्रारोहयो नांदेड यांनी (दि. १०) ऑक्टोंबर रोजी वादग्रस्त ग्रामरोजगार साह्यक एकंबे यास कामावरून निलंबीत करण्यासाठी बिलोली गटविकास अधिकारी पद्दमावर यांना लेखी आदेश दिला.
परंतु त्यावर अद्याप कारवाई न करता पाठीशी घातल्या जात आहे. यामुळे या रोजगार सेवाकाचा पुन्हा मुजोरपणा वाढला असून गावात रोहयोचे कामे करण्यास मोठा आडथळा निर्माण होत आहे. म्हणून या रोजगार सेवकाला तात्काळ कामावरून कमी करण्याची मागणी होत आहे.



