ताज्या बातम्यानांदेडनायगांव

महिला दिनानिमित्त ‘विशेष ग्रामसभा’ घेण्याच्या सुचनेचा अनेक ग्रामपंचायतींना पडला विसर

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण भागातील महिलामध्ये सुधारणा व्हावी त्यांचे मनोधैर्य उंचावले जावे यासाठी ग्रामपंचायतींनी ‘विशेष ग्रामसभा’ घ्यावी आणि गाव पातळीवर महिलांचा सन्मान वाढवावा असे आदेश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा आयोजित न करता जिल्हा परिषदेच्या आदेशालाच कचरा कुंडी दाखवली आहे हे विशेष.

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असताना नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीना मात्र ८ मार्च जागतिक महिला दिनाचाच विसर पडला आहे. ग्रामपंचायतींना महिला दिनाचा विसर पडू नये यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी महिलांसाठी ‘विशेष ग्राम सभा’ आयोजित करून महिलांचा सत्कार सन्मान करावा, पीडित महिलांच्या समस्यांचे निराकरण करावे, स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे, उंचावणे, गावपातळीवर महिलांना सन्मानाने वाढविणे महत्वाचे आहे असे गटविकास अधिकांना दिलेल्या आदेशात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले होते.

समाज म्हणून ही भावना जनसामान्यांच्या मनात रुजवणेही गरजेचे आहे, त्यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये दि. ८ मार्च रोजी ‘विशेष ग्राम सभा’ घ्यावी व त्यामध्ये बालविवाह रोखणे, पतीच्या निधनानंतर रुढी व अंधश्रध्देमुळे महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्या असे सुचविले होते पण केवळ मेळगाव, कुंटूर सह काही ग्रामपंचायती वगळता अनेक ग्रामपंचायतीत ग्रामसभा तर दूरच महिला दिनानिमित्त साधा महिलांचा सन्मानही करण्यात आला नाही.

विशेष म्हणजे या ग्राम सभेचे छायाचित्रीकरण करण्याच्या सूचना देखिल देण्यात आल्या होत्या. परंतु जिल्हा परिषदेच्या सुचनेला एकाही ग्रामपंचायतने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, उप मुख्य कार्यकारी सौ.कापसे यांनी लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

ग्रामसभा घेण्यासाठी पंचायत समितीच्या स्तरावरुनही तालुक्यातील ग्रामपंचायतींना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतली असून बाकीच्या ग्रामपंचायतमध्ये काय झाले ते पाहावे लागेल.
एल.आर. वाजे गटविकास अधिकारी, नायगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker