कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना विशेष सेवा पदक जाहीर

कुणाल पावरे
कुंडलवाडी :- गत वर्षभरापूर्वी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झालेले नारायण शिंदे यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात रुजू होण्याअगोदर गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात आपले कर्तव्य बजावले आहे.नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकरीत्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेला तीन वर्षाचा कालावधी यशस्वी पुर्ण केला असल्याने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विशेष सेवा पदक जाहीर केले असून विशेष सेवा पदक लवकरच त्यांना एका समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दि १२ ऑगस्ट रोजी राज्यातील गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकारकरीत्या आळा घालण्यासाठीचा तीन वर्षाचा कालावधी यशस्वी पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहेत.
यात कुंडलवाडी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांचा विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.दि.१८ आँक्टोबर २०२० ते दि.१४ जुलै २०२३ या कालावधीत ते गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते. गत वर्षभरापूर्वी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात रुजू झालेले नारायण शिंदे यांनी वर्षभरात अनेक गुन्ह्यांचा शोध लावण्यात यश मिळवले असून त्यांची एक वर्षाची कारकीर्द यशस्वी ठरली आहे.
त्यांना विशेष पदक जाहीर झाल्याने त्यांचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप पाटील, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, भोकर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे,धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते, सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी, कुंडलवाडी शहर व परिसरातील मित्रपरिवार व अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.