89 नायगाव विधानसभागावाकडच्या बातम्यानांदेड

देगावमध्ये भाजपची सभा मराठा कार्यकर्त्यांनी उधळली : प्रचंड घोषणाबाजीमुळे तणाव

प्रकाश महिपाळे

नायगाव : मराठा आमदार असलेल्या राजेश पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत कुठेच मदत तर केलीच नाही पण काही दिवसापुर्वी धनगर आरक्षणाला समर्थन देणारे पत्र काढले होते. त्यामुळे संतप्त असलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी देगाव येथे भाजपची सभा उधळून लावल्याने पुनम पवार व राजेश कुंटूरकर यांना अर्धवट भाषण सोडून जावे लागले. सभा उधळून लावण्यात आल्याचे व्हिडीओ वाऱ्यासारखे व्हायरल झाले असल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.

विधानसभेच्या प्रचाराचा जोर चढत असताना नायगाव मतदार संघात वाब्दीक बाण तिखट होत आहेत. विशेष म्हणजे भाजप वगळता सर्वच पक्ष संयमाने आणि मुद्याला धरुन सरकारवर टिकास्त्र सोडत आहेत. मात्र भाजपच्या उमेदवार राजेश पवार व त्यांची पत्नी पुनम पवार यांनी मात्र वैयक्तिक टिका व खालच्या पातळीवरुन चिखलफेक करत आहेत. पवार दांपत्याच्या चिखलफेकीमुळे विरोधक तर सोडाच पक्षातील जुनेही नाराज झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राजेश पवारांचा सुफडा साफ झाला पाहिजे यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

पवार दांपत्याच्या एकाधिकारशाही विरोधात भाजपमध्येच रोष असताना त्यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या रोषाला कारण ठरले ते आ.राजेश पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन होत असताना त्यांनी धनगर समाजाच्या मागणीला पाठींबा देवून धनगर समाजाचा अनुसूचित जामातीत समावेश करण्यासाठी दिलेले पत्र.

त्या पत्राने संपूर्ण मतदार संघातच संताप व्यक्त करण्यात येत असून राजेश पवारांच्या सभेत मराठा समाज घोषणाबाजी करुन आपला रोष व्यक्त करत आहेत. काही दिवसापुर्वी आंतरगाव येथेही पुनम पवार यांची सभा मराठा आंदोलकांनी सभा उदळली होती. त्यानंतर शनिवारी रात्री असाच प्रकार देगाव येथे घडला.

आ.राजेश पवार यांच्या प्रचारार्थ नायगाव तालुक्यातील देगाव येथे राजेश कुंटूरकर व पुनम पवार यांची जाहीर सभा होती. सभा सुरुही झाली होती एवढ्यात मराठा समाजाचे तरुण सभास्थळी आले. आणि त्या पत्राबद्दल रोष व्यक्त करतानांच मराठा समाजाच्या तरुणावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणीही नाराजी व्यक्त आ.राजेश पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि मराठा आरक्षण मिळालेच पाहीजे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशीही घोषणाबाजी झाल्याने सभास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली परिणामी राजेश कुंटूरकर यांना आपले भाषण अर्धवट सोडावे लागले.

आक्रमण झालेल्या मराठा समाजाच्या तरुणांनी पुनम पवार व राजेश कुंटूरकर गाडीत बसून जाईपर्यंत राजेश पवार हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या. देगावमध्ये घडलेल्या घटनेमुळे या प्रकाराची चर्चा तालुकाभर होय असून अशा घटना घडत असल्याने भाजपची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker