भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची सभा

प्रकाश महिपाळे
नायगाव : महाविकास आघाडीतील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण व नायगाव विधानसभेच्या उमेदवार डॉ. मिनल खतगावकर यांच्या प्रचारासाठी दि.11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी काँग्रेसचे स्टार प्रचारक बाळासाहेब थोरात यांची मांजरम येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. मांजरम परिसर हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा करण्यात येत असल्याने थोरातांची सभा ठेवून भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची व नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी प्रा. रवींद्र चव्हाण यांना तर नायगाव विधानसभेसाठी डॉ. मिनल खतगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी समन्वय ठेवून प्रचाराची प्रभावी यंत्रणा राबवत आहेत. विशेष म्हणजे मितभाषी असलेल्या चव्हाण व डॉ. मिनल यांनी अतिशय सौम्य भाषेत महायुती सरकारच्या वाभाडे काढताना दिसत आहेत. भाजप उमेदवारापेक्षा प्रचारात दोघांनीही आघाडी घेतली आहे.
भाजप उमेदवार राजेश पवार हे मांजरम माझा बालेकिल्ला असल्याचे सांगत असल्याने काँग्रेसने मांजरम येथे दि.11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता काँग्रेसचे स्टार प्रचारक बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा ठेवली आहे. थोरातांची सभा ठेवून काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसून येते.