डॉ.मिनल खतगावकरांसाठी शिरिष गोरठेकर मैदानात : राजेश पवारांची विजयाची वाट झाली बिकट

प्रकाश महिपाळे
नायगाव : नायगाव विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.मिनल खतगावकर यांच्या विजयासाठी गोरठेकर बंधू मैदानात उतरले आहेत. उमरी धर्माबाद तालुक्यात वर्चस्व ठेवून असलेले गोरठेकर बंधूंनी आ.राजेश पवार यांच्या विजयाची वाट बिकट करुन टाकली आहे.
दिवंगत माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांचे जेष्ठ चिरंजीव शिरिष गोरठेकर व कैलास गोरठेकर उमरी व धर्माबाद तालुक्यात वर्चस्व ठेवून आहेत. त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला त्यामुळे विधानभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी ही जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला सुटली असून कुठल्याही परिस्थितीत त्यांना निवडून आणायचे आहे असे सांगितल्यानंतर शिरिष व कैलास गोरठेकर यांनी आपली उमेदवारी तत्काळ मागे घेतली.
मागच्या निवडणुकीत राजेश पवार यांनी दिवंगत माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांचा पाठींबा मिळाल्याने विजयाचा गुलाल लागला होता. त्यांच्या पश्चात मात्र राजेश पवार गोरठेकर परिवाराकडे पाठ फिरवली आणि गोरठेकर परिवाराशी कृतघ्न झाले. राजेश पवार यांच्याबद्दल मतदारात नाराजी वाढली. त्यामुळे गोरठेकर बंधूनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
उमेदवारी मागे घेतल्यानंतर गोरठेकर मात्र डॉ.मिनल खतगावकर यांच्या प्रचारासाठी झोकून दिले आहे. उमरी व धर्माबाद तालुक्यात झंजावात निर्माण केला आहे. राजेश पवार यांच्या विरोधात मतदारात नाराजी वाढली आहे. जेव्हा मतदार नाराज होतात तेव्हा निवडून यायची शक्यता कमी असते. या मतदार संघात महाविकास आघाडीच्याच डॉ. मिनल खतगावकर आमदार म्हणून निवडून येणार असल्याचा आशावाद त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला आहे.
विकासाच्या नावाखाली आमदाराने किती भ्रष्टाचार केला हे जनतेला माहीत आहे. मतदार संघाच्या विकासाऐवजी स्वतःचा विकास करुन घेतला त्यामुळे वाढलेल्या नाराजी प्रचंड वाढली असल्याने गोरठेकरांनी उमरी व धर्माबाद तालुक्यातील आपल्या समर्थकांना कामाला लावले असून कार्यकर्ते डॉ.मिनल खतगावकर यांच्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवत असल्याने भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.