आ.राजेश पवार भाजपमध्येच पडले एकाकी : मतदार संघातील नेते प्रचारापासून दुरच

प्रल्हाद हिवराळे
उमरी : आ.राजेश पवार यांना आजपर्यंत भाजपातील जुन्या निष्ठावंतांशी तर जुळवून घेण्याचे तर जमलेच नाही पण एकतर्फी वागण्याने आहेत ते कार्यकर्ते दुरावलेत. त्यातच खा. चिखलीकर व आ. राम पाटील रातोळीकर यांच्याशी त्याची रास जुळली नाही. या सर्व प्रकारामुळे भाजपमध्ये मोठी धुसफूस सुरु असून. नाराज झालेल्या या निष्ठावंतांनी ऐन निवडणुकीत प्रचारापासून अलिप्त राहणेच पसंत केल्याने राजेश पक्षातच एकाकी पडले आहेत.
विद्यमान आमदार राजेश पवार हे २०१४ च्या पराभवानंतर २०१९ च्या मोदी लाटेत निवडून आलेत. आमदार झाल्यानंतर राजेश पवार यांनी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांशी तर सोडाच एकाही कार्यकर्त्याशी जुळवून घेतले नाही. ते स्वतः व त्यांची पत्नी एवढेच सिमित कार्यक्षेत्र झाले. त्याचबरोबर जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर व विधान परिषदेचे माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्याशीही त्याचे कधीच जुळले नाही. त्यामुळे नायगाव तालुक्यात भाजपमध्ये प्रचंड गटबाजी वाढली. भाजपचे जुने निष्ठावंत बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पा. होटाळकर, धनराज शिरोळे यांना विविध समित्यावर नियुक्त्या मिळू दिल्या नाहीत उलट पक्ष बांधणी व पदाधिकाऱ्यांच्या निवडीपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करत आले आहेत.
नायगाव तालुक्यात प्रताप पाटील चिखलीकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचबरोबर नातेवाईकांचेही जाळे आहे. राम पाटील रातोळीकर हे रातोळी नायगाव तालुक्याचे भुमिपुत्र असल्याने त्यांचेही तालुक्यात चांगलेच प्राबल्य आहे. त्याचबरोबर बालाजी बच्चेवार हे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहीलेले आहेत यांचा नायगाव व बरबडा भागात चांगला जनसंपर्क राहीलेला आहे. शिवराज पाटील होटाळकर हे तर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राहीलेले आहेत. श्रावण पाटील भिलवंडे हे पंचायत समितीचे सभापती होते त्यामुळे वरील सर्व जुन्या जाणत्यांच्या शब्दाला नायगाव तालुक्यात किमत आहे. त्याचबरोबर होटाळकरांनी तर चक्क बंडच केले हे विशेष.
विशेष म्हणजे गणेशराव करखेलीकर यांनी तर आ. पवारांची साथ सोडून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला तर बाजार समितीचे संचालक व आ.पवारांचे मावस भाऊ राजीव पाटील बोळसेकर हे प्रचारापासून दुरच आहेत. तसेच
शिवराज गाडीवान, विद्याताई अग्रवाल, अशोकराव पाटील वडजे, गोविंदराव रामोड, नारायण पाटील पवार, सुभाषराव खांडरे, सुधाकरराव देशमुख धानोरकर, पाडुरंग गळगे, ललैस पाटील मंगनाळीकर, डि.आर. कंदकुर्तिकर, किशन गायकवाड, सदानंद वडजे, सोमनाथ हेमके, संतोष मुटकूटवार, गजानन श्रीरामवार यांच्यासह अनेकांनी प्रचारापासून पाठ फिरवली आहे.
मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी तर आ.राजेश पवार यांच्या प्रचारापासून दुर आहेतच पण नायगाव तालुक्याचे भुमिपुत्र असलेले माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनीही भाजपच्या प्रचारात स्थान नाही. त्यामुळे आ.राजेश पवार यांच्या एककलमी कार्यक्रमाला सर्वच पदाधिकारी वैतागले तर नाहीत ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.