नरसी येथील लॉजवर देहविक्रीचा व्यवसाय पुन्हा जोमात : रामतीर्थ पोलीसांची बघ्याची भुमिका
प्रकाश महिपाळे
नायगाव : कमी दिवसात खूप पैसा कमविण्याच्या लालसेपोटी नरसी येथील जवळपास सर्व लॉज चालकांनी आपल्या लाॅजवर खुलेआम देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे मागील दोन तीन वर्षापासून नरसीचे लॉज हे वेश्या व्यवसायाचे अड्डे बनले आहेत. नरसी येथील लॉजवर सुरू असलेला खुलेआम चालत असलेले अश्लील धंदे बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जुन महिण्यात ग्रामस्थांनी दिला होता. मात्र केवळ पंधरा दिवसच लपूनछपून चालत असलेला वेश्या व्यवसाय पुन्हा जोमात आला आहे.
सामान्यपणे अडी अडचणीत असलेल्या नागरिकांना गाव सोडून अन्य गावी गेल्यानंतर राहण्या-खाण्याची व्यवस्था व्हावी. या उद्देशाने लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवसाय सुरू झाला. मात्र नरसी येथील जवळपास सर्व लॉज चालकांनी भरपूर पैसा कमविण्यासाठी लॉजिंग-बोर्डिंग ऐवजी खुलेआम देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी लाॅजचा वापर सुरू केला आहे.
ह्या लॉज चालकांचे गावोगावी असलेले एजंट व्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि ग्राहकांना या ठिकाणी आणतात. गावात ज्या-ज्या भागातील लॉजवर हा व्यवसाय चालतो त्या त्या भागातील महिला-मुलींना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे. कारण वेश्यागमन करणारे आंबट शौकीन रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालतात.
विशेष म्हणजे नरसी येथे रामतीर्थ पोलीस ठाण्याची चौकी आहे. नरसी फाटा हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्व बाबींची खडानखडा माहिती ठेवणाऱ्या पोलिसांना हा व्यवसाय माहीत नव्हता का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. मागील दोन तीन वर्षांपासून सुरु असलेला देहविक्रीच्या व्यवसायाचा उपद्व्याप बंद व्हावा यासाठी येथील जागरूक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता परंतु लॉज चालकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत व्यवसाय सुरूच ठेवला. देहविक्री व्यवसायाचा अतिरेक झाल्यामुळे जुन महिन्यात जागरूक ग्रामस्थांनी तक्रार दिली होती यावर बैठकही झाली बंद करण्याचा निर्णयही झाला पण केवळ पंधरा दिवसच.
तक्रारीमुळे लाँज चालक व मालकांनी लपूनछपून फक्त पंधरा दिवसच वेश्या व्यवसाय चालला नंतर मात्र बिनबोभाटपणे सुरु आहे. दिवसरात्र परिसरातील महिला मुली लाँजवर बिनदिक्कतपणे वावरत असताना आणि त्यांना नासवण्याचे काम होत असतांना रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व त्यांची टिम केवळ बघ्याची घेत असल्याने या अश्लील प्रकाराला त्यांचाच तर पाठींबा नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
दर दोन तीन दिवसाला लाँज तपासण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचा एक अधिकारी आणि कर्मचारी जातो पण तेथे संबधीत नसलेल्या लोकावर कारवाई करण्याऐवजी तडजोडी करत असल्याची चर्चा होत आहे.