नायगाव विधानसभा मतमोजणी 14 टेबल 25 फेऱ्या : आमदार कोण होणार याकडे लक्ष

प्रकाश महिपाळे
नायगाव : नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला शनिवारी दि. २३ रोजी स्वामी रामानंद तिर्थ विद्यापिठात सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. चौदा टेबलवर २५ राऊंडमध्ये मतमोजणी होणार असुन दुपारी बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार कोण होणार याची मतदारांना उत्सूकता लागली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निडणूक २०२४ साठी बुधवारी दि.२० रोजी नायगाव विधानसभा मतदार संघात ७४.०३ टक्के मतदान झाले असून मत मोजणी शनिवारी दि.२३ रोजी स्वामी रामानंद तिर्थ विद्यापिठात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. या मतमोजणी साठी एकूण २५ टेबलचे नियोजन करण्यात आले असून असून त्यापैकी १४ टेबल ई व्ही एम मशीनची मतमोजणी तर ९ टेबल टपाली मतपत्रिकेची मतमोजणी तसेच २ टेबल ETPBS द्वारे मतमोजणीसाठी असतील मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक असे कर्मचारी नेमण्यात आले असून एकूण २५ फेरीमध्ये मतमोजणी संपन्न होईल.
या शिवाय तीन लेअरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अवधकारी यांचेकडून ओळखपत्र प्राप्त अधिकारी, कर्मचारी यांनाच प्रवेश असेल. प्रत्येक उमेदवारांना जास्तीत जास्त २५ मतमोजणी प्रतिनिधी याकामी नेमता येतील. या शिवाय कोणीही अनाधिकृत व्यक्तींना मतमोजणी कक्षात प्रवेश असणार नाही.
मतमोजणी केंद्राबाहेरील वाहतूक व्यवस्था पोलिस यंत्रणा करणार आहे. मुख्य प्रवेश द्वारावरुनच आतमध्ये ओळखपत्र तपासून पोलिस प्रवेश देतील. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रानिक उपकरण नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
अतिशय चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या असलेल्या नायगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेश पवार व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. मिनल खतगावकर व वंचित बहूजन आघाडीचे डॉ. माधव विभूते या तिघांमध्ये खरी लढत झाली. डॉ. मिनल खतगावकर यांनी राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा लावून वातावरण ढवळून काढले होते. तर भाजपचे राजेश पवार यांच्यासह मतदार संघात एकाही राज्य पातळीवरील नेत्यांची सभा झाली नाही. राजेश पवार व त्यांच्या पत्नी पुनम पवार यांनी मतदार संघ अक्षरशः पिंजून काढला.
झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून कार्यकर्त्यांचे लक्ष आता निवडणूक निकालाकडे लागले आहे. गावात झालेल्या मतदानाबाबत गावोगावी आणि वाडीतांड्यावर वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आमचेच साहेब, आमचीच मँडम विजयी होणार असा दावा करू लागले आहेत. तसेच या बुथवर ‘आम्ही प्लस तर त्या बुथवर तुम्ही मायनस होणार’ अशी चर्चा झडत आहे. काही कार्यकर्ते उमेदवाराच्या विजय पराजयाबाबत व आपले बुथ प्लस-मायनस बाबत पैजा लावत असल्याचे दिसत आहे.