अबब….. चाळीस लाखाची लाच घेतांना सापळ्यात अडकला : नांदेड येथील घटना

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : निवासी दिव्यांग कार्यशाळा नांदेड येथील कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत वेतन काढण्यासाठी 54 लाखाची मागणी केली. तडजोड 48 लाखावर झाली आणि 40 लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची घटना दि. 22 रोजी नांदेड छत्रपती चौकाजवळील बिरसा मुंडा चौकात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. 40 लाखाची लाच स्विकारतांना सापळ्यात अडकलेली नांदेड जिल्ह्यातील पहीलीच घटना असावी.
या प्रकरणातील तक्रारदार यांनी दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे हजर येवून तक्रार दिली की, त्यांचे कुटूंरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा, राज कॉर्नर, नांदेड येथील कर्मचाऱ्याचे वेतन प्रलंबीत आहे. सदरील वेतन समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेण्यासाठी आरोपी लोकसेवक यादव सुर्यवंशी, शिवराज बामणे यांनी रुपये 54,00,000 लाचेची मागणी केली आहे. तक्रारदाराने बोलचाल करून 48,00,000 रुपये देण्याची तयारी सांगितल्यावर त्यांचे देयक मंजूर करण्यात आले व त्यातून बँकेतून लाचेची रक्कम काढून आणून देण्यास तक्रारदारास सांगण्यात आले.
सदरची रक्कम ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना संबंधितांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी त्यांचे दिव्यांग कार्यशाळेतील कर्मचा-यांचे वतीने याबाबत तक्रार दिली. नमुद तक्रारीवरून ला.प्र.वि., नांदेडकडून दि. 13 नोव्हेंबर 2024, दि. 15 नोव्हेंबर 2024, 17 नोव्हेंबर 2024, दि. 18 नोव्हेंबर 2024 व दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. सदर पडताळणीत आलोसे यादव सुर्यवंशी, शिवराज बामणे व चंपत वाडेकर यांनी तक्रारदार यांना पंचासमक्ष प्रत्यक्ष व फोनद्वारे वेळोवेळी प्रलंबीत बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून 54,00,000 रूपये लाचेची मागणी केल्याचे आढळून आले.
त्यानंतर दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी आरोपी लोकसेवक शिवराज बामणे व चंपत वाडेकर हे छत्रपती चौकाजवळील बिरसा मुंडा चौकात तक्रारदार यांच्याकडून ठरलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी 40,00,000 रूपये लाच स्विकारून व आरोपी लोकसेवक शिवराज बामणे हे तक्रारदार यांना त्यांचे मोटार सायकलवर बसवून घेवून जात असतांना रंगेहाथ मिळून आले आहे.
यातील आरोपी लोकसेवक शिवजराज बामणे व चंपत वाडेकर यांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे. भाग्यनगर, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई यशस्वी करण्यासाठी गजानन बोडके, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड पो हे काँ राजेश राठोड, पोकॉ अरशद अहेमद खान, पोकॉ सयद खदीर, चापोना प्रकाश मामुलवार यांच्या टिमने परिश्रम घेतले.