लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेसाठी छप्परफाड मतदान: ‘सुफडा’ साफचा मुद्दा निष्प्रभ
प्रकाश महिपाळे
नायगाव : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी छप्पर फाड मतदान झाले आहे. मराठा समाजात दोन गट पडले असल्याने सुफडा साफचा मुद्दा निष्प्रभ ठरला. सायंकाळी ६ वाजल्याच्या नंतरही असंख्य मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. रांगा लागलेल्या मतदारांचे रात्री ९ वाजेपर्यंत मतदान झाले. यात ६९.५० टक्के मतदान झाल्याने वाढलेला मतदानाचा टक्का कुणाची विकेट घेणार अशी चर्चा होत आहे.
नायगाव मतदार संघातील ३५० मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. प्रशासनाच्या वतीने मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यामुळे मतदार संघातील नायगाव, उमरी व धर्माबाद शहरासह खेड्यापाड्यात आणि वाडी तांड्यावर मतदान शांततेत पार पडले.
तालुक्यातील कुष्णूर येथे युवा बुथ, नरसी येथे दिव्यांग तर नायगाव शहरातील बाजार समितीच्या मतदान केंद्राला सखी मतदान केंद्र बनवण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद कँंप येथील शाळेत हरित आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रावर करण्यात आलेल्या सजावटीमुळे सदरचे केंद्र मतदारांसाठी आकर्षण ठरले.
निवडणूक आयोगाने जेष्ठ मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची व्यवस्था केली होती तरीही अनेक जेष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर जावूनच आपला मतदानाचा हक्क बजावला. पहील्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवा मतदारात कमालीचा उत्साह दिसून आला. विशेष बाब म्हणजे छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्यांनी दुकान उघडण्याच्या अगोदर मतदान करणे पसंत केले.
नायगाव मतदार संघात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि विधानसभेसाठी एकत्रच मतदान पार पडले त्यामुळे मतदानासाठी उशीर होत होता त्यामुळे सायंकाळी ६ वाजल्यानंतरही अनेक केंद्रावर मतदानासाठी मोठ्या रांगा दिसून आल्या. रांगा लागलेल्या मतदारांचे रात्री ९ वाजेपर्यंत मतदान झाले. दहा तृतीय पंथीयापैकी किती मतदान झाले याची आकडेवारी प्रशासनाकडे दिसून आली नसली तरी रेखा देवकर या तृतीय पंथी मतदाराने नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.
नायगाव विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत दिसून आली. काँग्रेसच्या डॉ. मिनल खतगावकर, भाजपचे आ. राजेश पवार व वंचित बहूजन आघाडीचे डॉ. माधव विभूते यांच्या लढत झाली. तिन्ही उमेदवारांनी विधानसभेचे मैदानावर गाजवले त्यामुळे मतदार संघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे यंदा ६९.५० टक्के मतदान झाले. तर २०१९ निवडणुकीत ६७.८३ टक्के मतदान झाले होते. यंदा वाढलेल्या मताने विजयाचा दावा करणाऱ्या उमेदवाराची धाकधूक वाढली असून हे वाढलेले मतदान कुणाची विकेट घेते अशी चर्चा होत आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार प्रा.रवींद्र चव्हाण हे नायगावचे भुमिपुत्र असून त्यांनी जुन्या नायगाव शहरातील मतदान केंद्रावर मतदान केले. नायगाव विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.मिनल खतगावकर यांनी नरसी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. तर भाजप उमेदवार राजेश पवार यांनी त्यांच्या आलुवडगाव येथे मतदानाचा हक्क बजावला.