89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानांदेड

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे आ. राजेश पवारांच्या गोटात अस्वस्थता

प्रकाश महिपाळे

नायगाव : भाजप पक्षश्रेष्ठींनी नायगाव मतदार संघात एकही बड्या नेत्याची सभा घेतली तर नाहीच पण आ.राजेश पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील असतांना त्यांनीही नायगाव मतदार संघात एकही जाहीर सभा घेतली नाही. त्यातच मतदार संघातील जुने व निष्ठावंत प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे भाजपने राजेश पवार यांची धाकधूक वाढली असून ते पराभवाच्या छायेत असल्याची जोरदार चर्चा मतदार संघात होत आहे.

विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस, भाजप, अजित पवार गट, वंचित बहूजन आघाडी, प्रहार जनशक्ती च्या देश पातळीवरील व राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या. भाजपनेही जिल्ह्यातील काही मतदार संघातील उमेदवारासाठी जाहीर सभा घेतल्या पण नायगाव मतदार संघात मात्र भाजपच्या एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ.मिनल खतगावकर यांच्या प्रचारार्थ इमरान प्रतापगढी, बाळासाहेब थोरात, आ.अमित देशमुख यांच्या तर जाहीर सभा झाल्याच पण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा रोड शो देखील झाला.

भाजपसाठी अनुकूल असलेल्या नायगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत वातावरण बदलून टाकले. काँर्नर सभांचा धडका लावला, गावागावात प्रचार फेऱ्या घेतल्या. डॉ.मिनल खतगावकर यांच्या प्रचारार्थ मतदार संघात १५० सभा झाल्या. या तुलनेत राजेश पवार प्रचारात खुपच मागे पडल्याचे चित्र मतदार संघात दिसून येत आहे. त्याचबरोबर मतदार संघातील अनेक दिग्गज काँग्रेसच्या बाजूने मैदानात उतरले. त्यामुळे काँग्रेससाठी ही जमेची बाजू झालेली असताना भाजप उमेदवार राजेश पवार यांच्यासाठी एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही. उमरी येथे फक्त माजी मुख्यमंत्र्याची तेवढी सभा झाली.

नायगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील असल्याने पहील्या यादीतच त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नायगाव मतदार संघातील वातावरण ढवळून काढण्यासाठी भाजप नेते प्रचारांचा व जाहीर सभांचा धडाका लावतील असे वाटत होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष राहील असे वाटत असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील मुखेड व किनवट-माहूर मतदार संघात सभा घेतली पण नायगाव मतदार संघाकडे फिरकले नाहीत.

फडणवीस यांच्या गुडबुकमधील असलेल्या राजेश पवारासाठी भाजपच्या टिममधील एकाही नेत्यांनी जाहीर सभा घेतली नाही. विशेष म्हणजे मतदार संघातील जुने व निष्ठावंत राजेश पवार यांच्या प्रचारापासून अलिप्त राहणेच पसंत केले आहेत. त्यामुळे आ. राजेश पवार यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

मतदानाच्या शेवटच्या दिवसापार्यंत राज्य पातळीवरील एकही नेता तर आलाचा नाही पण मतदार संघातील पदाधिकारीही फिरकले नसल्याने आ. राजेश पवार व त्यांच्या पत्नी पुनम पवार यांनीच मतदार संघात बैठका व सभा घेतल्या आहेत. आ.राजेश पवार मतदार संघात एकाकी पडण्यामागे त्यांची पदाधिकारी व कार्यकर्त्याबद्दल वागण्याची पध्दत कारणीभूत असल्याची दबक्या आवाजात भाजपातीलच जुने जानते करत आहेत.

राज्य पातळीवरील नेत्यांनी दूर्लक्ष केल्याचा आणि मतदार संघातील निष्ठावंतांनीही प्रचारापासून दुर असल्याचा संदेश मतदार संघात गेल्यामुळे आ.राजेश पवार पराभवाच्या छायेत असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker