कांडाळा येथील बोगस नाली बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश

प्रकाश महिपाळे
नायगाव : तालुक्यातील कांडाळा येथील दोन कोटी रुपये खर्चाच्या होत असलेल्या बोगस कामाची चौकशी करावी असे आदेश मुख्य अभियंत्यांनी नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहेत. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे यांनी तक्रार दिली होती.

नायगाव तालुक्यातील कांडाळा येथे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुने बंदीस्त नाली बांधकाम होत आहे. अनेक वर्षाच्या नंतर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बंदिस्त नाली बांधकामासाठी जवळपास दोन कोटीचा निधी शासनाने उपलब्ध करु दिला आहे. हे नुसरत कंस्ट्रक्शन कंपनी करखेली हे करत आहेत. या कंपणीचे सर्वेसर्वा असलेले मोईज करखेलीकर हे बोगस व निकृष्ट दर्जाचे काम करण्यात अग्रेसर असून त्यांच्या बोगस कामाच्या अनेक तक्रारी यापूर्वी झालेल्या असतांनाही आमच्या गावासाठी अतिशय महत्वाचे काम त्यांनाच दिलेले आहे.

त्यामुळे आमच्या गावातील कामही ते सुमार दर्जाचे करत आहेत. काम पुर्ण झालेले नसतांना बंदिस्त नालीवरच्या छताला भेगा पडत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामाची परिस्थिती पाहता सदरचे बंदिस्त नाली बांधकाम हे जास्त दिवस टिकण्याची शक्यता दिसून येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम होत असताना नायगाव सांगितले बांधकाम उपविभागाचे उप अभियंता बारसकर व या कामगार देखरेख ठेवणारे कनिष्ठ अभियंता धाबे जाणीवपूर्वक व अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत.
त्यामुळे कांडाळा येथील या बोगस व सुमार दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि चौकशी होईपर्यंत बिल अदा करण्यात येवू नये. माझ्या तक्रारीच दखल घेवून आठ दिवसात चौकशी करुन कारवाई अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे यांनी (ता.८) नोव्हेंबर रोजी केली होती.
भद्रे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांनी नांदेडच्या अधिक्षक अभियंत्यांना सदर प्रकरणी तक्रारीत नमूद केलेल्या मुद्यानुसार चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मागच्या आठ दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुठलीच चौकशी करण्याच्या तयारीत नाहीत. या प्रकरणी अधिक्षक अभियंत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.