नायगाव शहरातून भर दिवसा तीन लाखाची रक्कम पळवली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी टेंपोमधील तीन लाखाची रक्कम घेवून धुम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि ज्या मार्गाने मोटारसायकल स्वारांनी धुम ठोकली त्या रोडवरील सी सी टि व्ही कँमेरे तपासण्याचे काम सुरु असून. नायगाव पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे.
नायगाव शहरातील एका व्यापाऱ्यांने कुष्णूर येथून तेल आणण्यासाठी टेंपो चालकाजवळ 3 लाखाची रक्कम दिली. टेंपो चालक चालकाच्या बाजूला असलेल्या शिटवर रक्कम ठेवली व तो आंबेडकर चौकाजवळील गोदामाजवळ उतरून रिकाम्या टाक्या घेण्यासाठी टेंपोच्या पाठीमागे गेला असता. तेवढ्यात शिवाजी चौकातून मोटारसायकलवर भरधाव आलेल्या दोन तरुणांनी फिल्मी स्टाईलने टेंपोमधील 3 लाखाची बँग उचलली व धुम ठोकली. कुणाला काही समजण्याच्या अगोदरच मोटारसायकलवर आलेल्या तरुणांनी सुसाट वेगाने पळ काढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
काही क्षणातच 3 लाखाची रक्कम चोरट्यांनी पळवल्याने नायगाव पोलीसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली असून नायगाव पोलीस ठाण्याला सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत. घटनेची माहिती समजल्यावर काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी डॉ. आंबेडकर चौक ते बसस्थानकापर्यतचे सी सी टिव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीही लागला नाही.
मोटारसायकलवर दोन चोरटे आले आणि पाहता पाहता चक्क तीन लाखाची रक्कम घेवून गेल्यामुळे व्यापाऱ्यांत भितीच वातावरण निर्माण झाले आहे. रक्कम पळवणारे चोरटे सापडले पाहिजेत यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे पण सदरचे वृत्त लिहीपर्यत चोरट्याचा माग सापडला नाही. रक्कम पळवल्या प्रकरणी तक्रार देण्यासाठी टेंपोचालक पोलीस ठाण्यात गेला असून सदरची घटना बुधवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. चक्क दिवसा ढवळ्या एवढी मोठी रक्कम पळवण्यात आली असल्याने या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान नायगाव पोलीसासमोर उभ टाकल आहे.