बरबडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात ‘वेळेचा खेळ’ डॉक्टराना वेळेची शिस्त नसल्याने पशुपालक नाराज

भगवान शेवाळे
बरबडा : गावातील पशुवैद्यकीय दवाखाना हा पशुपालकांसाठी अत्यावश्यक सेवा केंद्र असताना, सध्या या दवाखान्याच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत वेळेची शिस्त पाळली जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
पशुपालकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी अनेकदा ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा दवाखान्यात उपस्थित राहत असून काही वेळा नियोजित वेळेआधीच दवाखान्यातून निघून जातात. गुरुवारी देखील असाच प्रकार समोर आला असून, दुपारी दोन ते अडीच दरम्यान येथील पशुवैद्यकीय अधिकारी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गैरहजर असल्याची बाब समोर आली आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना हा शासनाचा महत्त्वाचा सेवा घटक असून, त्याठिकाणी वेळेची शिस्त राखणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून सामाजिक दायित्वदेखील आहे. शासनाकडून वेतन व सुविधा मिळत असताना, पशुपालकांना वेळेवर व दर्जेदार सेवा देणे अपेक्षित असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, दवाखान्याच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कडक सूचना कराव्यात, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे.



