कुंडलवाडीत पोलीस अधिकारी शालेय विद्यार्थ्यांना देत आहेत कबड्डीचे धडे ◆ सपोनि भागवत नागरगोजे यांचा उपक्रम

कुंडलवाडी :- समाजात राहत असताना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत शालेय विद्यार्थ्यांना खेळाबद्दल आवड निर्माण होऊन सुसंस्कारित विद्यार्थी घडावेत व वाईट व्यसनापासून दूर राहून आदर्श पिढी निर्माण व्हावी यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे हे दररोज पोलीस ठाण्याच्या परिसरात शालेय विद्यार्थ्यांना कबड्डी खेळाचे धडे देत आहेत. या उपक्रमाबद्दल सपोनि भागवत नागरगोजे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस विभागात अधिकारी म्हणून काम करीत असताना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत तणावपूर्ण वातावरणात अधिकाऱ्यांना वावरावे लागते. ग्रामीण भागात खेळांना म्हणावे तेवढे महत्त्व देण्यात येत नाही.मातीतल्या खेळांना उत्तेजना मिळण्याबरोबरच आदर्श युवा पिढी निर्माण व्हावी. सध्याची पिढी विविध व्यसनाने ग्रासलेली असून या व्यसनापासून युवावर्ग दूर राहावे तसेच शरीर हीच संपत्ती आहे या दृष्टिकोनातून शालेय जीवनापासूनच खेळाच्या माध्यमातून शरीराकडे लक्ष द्यावे या उदात्त हेतूने कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पोलीस ठाणे परिसरात १४ ते १७ वयोगटातील २० ते ३० विद्यार्थ्यांना दररोज कबड्डी खेळाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करून सराव घेत आहेत. कबड्डी खेळाचे मैदानासाठी उस्माननगर येथून विशेष माती आणून क्रीडांगण तयार करण्यात आले आहे.तसेच स्वखर्चातून विद्यार्थ्यांना कबड्डी खेळासाठी लागणारी कीट सुद्धा सपोनि नागरगोजे यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
सपोनि भागवत नागरगोजे हे स्वतः एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू असून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून दोन वेळेस कबड्डीचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. तसेच मराठवाडा कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. बीड व पैठण येथे कबड्डी खेळाचे क्लब चालवून अनेक खेळाडू घडविले आहेत. राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळामध्ये पंच म्हणूनही कामगिरी बजावली आहे. या खेळाचा प्रदीर्घ अनुभव सपोनि नागरगोजे यांना आहे.
सपोनि भागवत नागरगोजे हे ज्या शहरात पोलीस अधिकारी म्हणून जातात तेथे युवा पिढींना कबड्डी खेळाचे मार्गदर्शन करतात.कुंडलवाडी शहरातही युवा पिढी कबड्डी खेळाच्या माध्यमातून घडली पाहिजे हेतूने त्यांनी कबड्डी खेळाचे मार्गदर्शन सुरू केले आहे.
२८ डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांना कबड्डी खेळाचे धडे देत असलेल्या पालकांची व शहरातील पत्रकारांची बैठक घेत कुंडलवाडी शहराचे नाव कबड्डी खेळामध्ये आगामी काळात उज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला.यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार,पत्रकार पत्रकार गणेश कत्रुवार, पत्रकार कुणाल पवारे, महम्मद अफजल, अमरनाथ कांबळे, सिद्धार्थ कांबळे, मुकेश जोशी यांच्यासह शालेय खेळाडूंचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कबड्डी खेळासाठी बनवलेल्या क्रीडांगणाचे उदघाटन करण्यात आले