ताज्या बातम्यानायगांवराजकारण

‘दादा’ ला बाजूला ठेवून अविनाश घाटेंचा ‘बेटमोगरा’ मार्गे काँग्रेसमध्ये प्रवेश

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघात वर्चस्व ठेवून असलेले जिल्ह्यातील वजनदार व्यक्ती भास्करराव पाटील खतगावकर यांना बाजूला ठेवून मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खतगावकरांच्या गुडबुकमधील घाटे यांनी परस्पर काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने ‘दादा’ची साथ सोडली का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतांनाच भावी आमदारांच्या यादीत अविनाश घाटे यांचाही समावेश झाला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर यांच्या माध्यमातून हा प्रवेश सोहळा घडवून आणण्यात आला आहे असे आता बोलल्या जात आहे. माजी आमदार सुभाष साबने यांच्यानंतर मुखेडमधून बिलोलीत शिफ्ट होणार घाटे दुसरे राजकारणी आहेत.

बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघात आपले राजकीय वजन ठेवून असलेले माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर व त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना विधानसभेत पाठवण्याची किमया केली. त्यामुळे खतगावकरांचे असलेले वर्चस्व अधोरेखित झाले आहे. आजही ‘दादा’ शिवाय राजकीय घडामोडी यशस्वी होत नाहीत हे माहीत असतांनाही अविनाश घाटे यांनी बेटमोगरेकर यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे घाटे हे दादांच्या गुडबुकमधील असतांना ते बेटमोगरा मार्गाने काँग्रेसमध्ये का गेले असेही आता बोलल्या जात आहे.

हनमंतराव बेटमोगरेकर यांनी घाटे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देवून मुखेड मतदारसंघात आपली जागा सेफ करण्याचा प्रयत्न केला असला तरी महाराष्ट्राच्या राजधानीत घडणाऱ्या वेगवान घडामोडीमुळे मुखेडमध्ये कोणती परिस्थिती निर्माण होते हे काही सांगता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker