सिनेमा टाकीसमोरील अवैध दारू विक्रीवर कुंडलवाडी पोलिसांची कारवाई
◆१६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त ◆आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरातील सिनेमा टाकीसमोर अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कुंडलवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १,६८० रुपये किमतीच्या २१ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक २२ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कुंडलवाडी येथील सिनेमा टाकीसमोर एक जण अवैध दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी सापळा रचून ही कारवाई केली. या छाप्यात आरोपी शिवाजी महाराज कोनेरवार (रा. कुंडलवाडी) याला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून देशी दारू ‘संत्रा भिंगरी’च्या २१ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी पोलीस अंमलदार आनंद बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७/२०२६ अन्वये, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक माधव पाटील, पोलीस कर्मचारी संतोष संगेवार, भगवान श्रीरामे, आनंद बोडके, शिवराज गंगुलवार आणि अजय बोलमवार यांच्या पथकाने केली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कुंडलवाडी परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, अवैध धंद्यांविरोधातील अशा कारवाया पुढेही तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.



