विशेष पथकाची बिलोलीत हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड ; पाच जुगाऱ्यांना अटक : सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त : पंधरा जुगारी फरार

प्रकाश महिपाळे
नायगाव : बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी रोडवर असलेल्या हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड मारुन तब्बल 16 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून 15 जुगारी फरार झाले आहेत. विशेष म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी व बिलोली पोलीसांच्या आशिर्वादाने हा जुगार अड्डा सुरु असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.
बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या जुगार अड्ड्यासह अवैध धंदे सुरु आहेत. एरवी कुठल्याही पोलीस ठाण्यात च्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कायवाई करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावर यांना त्यांच्याच नाकाखाली सुरु असलेल्या अवैध धंद्याची माहिती मिळाली नाही परंतु पोलीस उपमहानिरीक्षकाच्या पथकाला ही माहिती मिळाल्याने त्या पथकाने सुरु असलेल्या हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर कारवाई केल्याने पानेगावर यांच्यासह बिलोली पोलीस ठाण्याच्या ठाणेदार भोसले यांचे पितळ उघडे पडले आहे.
बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी रोडवरील प्रताप अंकुशकर यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक बेकायदेशीररित्या ‘अंदर-बाहेर’ नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सूरजकुमार तिडके आणि त्यांच्या पथकाने सोमवारी दि. 2 फेब्रुवारी रोजी रात्री 11.55 च्या धाड मारली.
यावेळी रसुल शेख अहमद शेख वय 45 रा. बिलोली, बोझा चंद्रशेखर गौड वय 50, रा.मोसरा, जि.निजामाबाद, आकाश विठ्ठल कांबळे वय 33, रा.बोधन, जि.निजामाबाद, कामी रेड्डी रमन्ना रेड्डी वय 35, रा.सालुपरा, जि.निजामाबाद, शेख नबी मिनुमियाँ वय 32, रा.सालुरा, जि.निजामाबाद यातील बहुतांश आरोपी शेजारील तेलंगणा राज्यातील आहेत ते येथे जुगार खेळण्यासाठी आले होते.
पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी छाप्यात काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन 15जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 16,68000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये रोख रक्कम: 3 लाख 6 हजार रुपये. विविध कंपन्यांचे महागडे 5 स्मार्टफोन 40 हजार रुपये किमतीची एक विना क्रमांकाची मोटारसायकल व इतर जुगाराचे साहित्य जप्त केले आहेत
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरजकुमार तिडके यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने पार पाडली. शहरात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.
पांढरपेशी जुगार -यांना पोलिसांचे अभय…
सोमवारच्या रात्रीला विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्या मध्ये जुगार चालकासह 15 पांढरपेशी जुगारी फरार होण्यात यशस्वी झाले. ज्यामध्ये जुगार अड्डा चालक व पांढरपेशी जुगार्यांना पळवण्यासाठी व त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी एका राजकीय पुढाऱ्याने तडजोड केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पांढऱ पेशी जुगा-यांना पोलिसांचे अभय मिळत असल्याची बाब समोर येत असून विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या कारवाईकडे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.



