RTE प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाला २५ मार्चपर्यंत मुदतवाढ ; अंतराची अटही शिथिल

प्रकाश महिपाळे
पुणे :- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा करणाऱ्या पालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता २५ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली असून, शाळेपासूनच्या अंतराची जाचक अटही शिथिल करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
मुदतवाढ: यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मार्च होती. आता पालकांना बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. १ किमी अंतराची अट शिथिल: याआधी पालकांना त्यांच्या निवासापासून १ किमी अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, उच्च न्यायालय, मुंबई (खंडपीठ नागपूर) येथील आदेशानुसार, जर १ किमी अंतरावर शाळा उपलब्ध नसेल, तर त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून मुलांन रोखता येणार नाही.
अर्जांमध्ये दुरुस्तीची संधी: ज्या पालकांनी १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांना त्यांचे अर्ज पुन्हा तपासून ‘Confirm’ किंवा ‘Unconfirm’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पोर्टलवर एक विशेष ‘Popup Window’ दिसेल.
पालकांसाठी महत्त्वाची सूचना
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पालकांना घरापासून लांब असलेल्या शाळांचे पर्यायही निवडता येतील. ज्या पालकांनी अद्याप अर्ज भरलेला नाही किंवा ज्यांना आपल्या अर्जात बदल करायचा आहे, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील जास्तीत जास्त मुलांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा, या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.



