घरगुतीगॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांची लूट शंकरनगर परिसरात गॅस सिलेंडर विक्रेत्यांना आले अच्छे दिन ९४० चे गॅस १६०० रुपयाला

मोरे मनोहर
किनाळा :- घरगुती गॅसचा नांदेड जिल्ह्यात कसलाही तुटवडा निर्माण होणार नाही असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून कळवण्यात आले असले तरी आखातामधील युद्धामुळे घरगुती गॅस पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करत अनेक ग्राहकांना घरगुती गॅस टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे आपल्याकडे गॅस उपलब्ध नाहीत असे सांगून शंकरनगर परिसरात ९४० रुपयाचा घरगुती गॅस चक्क १६०० रुपायला देत असल्याने गॅस विक्रेतांना अच्छे दिन आले असून ग्राहकांची मात्र लूट केली जातअसल्याने ग्राहक आर्थिक संकटात सापडले आहेत.
शंकरनगर परिसरात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरवून काही विनापरवाना विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. साधारण ९४० रुपयांचा गॅस सिलेंडर तब्बल १६०० रुपयांना विकला जात असल्याच्या तक्रारी नागरिकातून केल्या जात असुन काही मोठ्या एजन्सीकडून अनेक खेड्यापाड्यात ठिकठिकाणी विनापरवाना गॅसविक्रेत्यांना ग्राहकांना गॅस सिलेंडर विकण्यासाठी उपलब्ध करून दिले असल्याने याचा फायदा घेत काही विनापरवाना गॅस विक्रेते सामान्य ग्राहकांना जादा दराने गॅस विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिका-इराण-इस्रायल तणावामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असा बनाव करून ग्राहकांमध्ये भीती पसरवली जात असल्याने ग्राहक आपणास गॅस सिलेंडर मिळतो की नाही या भीतीने आवाच्या सवा भाव असला तरी गॅस सिलेंडर घेण्यासाठी मात्र रांगा लावून गॅस घेण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नांदेड जिल्ह्यासह बिलोली तालुक्यात गॅसचा कसलाही तुटवडा नसून सर्व ग्राहकांना बुकिंगनुसार घरपोच सिलेंडर पुरवठा नियमित सुरू असुन अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत एजन्सीकडूनच गॅस घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शंकरनगर परिसरात परवानाधारक गॅसएजन्सीधारकाकडुनच ग्राहकांना गॅस टंचाई निर्माण झाली असल्याचे सांगत खेड्यापाड्यात विनापरवाना गॅस विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणात गॅस पुरवठा करून विना परवाना गॅस विक्रेत्याच्या माध्यमातून बे भावात ग्राहकांना गॅस विक्री करून ग्राहकाची आर्थिक लूट केली जात असल्याने गॅस एजन्सी धारक व विनापरवाना गॅस विक्रेते या दोघांच्या संगनमताने ग्रामीण भागातील सामान्य जनतेची आर्थिक लूट केली जात आहे याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन ग्राहकांची होणारी गैरसोय सोडवावे असी मागणी सुज्ञ ग्राहकातून केली जात आहे.



