कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील पक्षातच सामना ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झंझावात प्रचारामुळे विरोधक बँकफुटवर
◆ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून ऐन हिवाळ्यात कुंडलवाडी शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच नगरपालिका निवडणुकीत महायुती तील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेना या तीन घटक पक्षात सामना रंगत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार सभा, प्रचार रँली, प्रभागातील काँर्नर बैठकास मतदारांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे विरोधक बॅक फुटवर गेल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे महायुतीतील घटक पक्षातील लढतीत जड असल्याचे सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे.

कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजप अंतर्गत निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक घडामोडी घडल्या यात भारतीय जनता पक्षाने पक्षाशी निष्ठावंत असलेले व लोकसभा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणारे माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार व माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांना भारतीय जनता पक्षांने नगराध्यक्ष पदाच्या तिकीट वाटपात डावलून अवघ्या सहा दिवसापुर्वी पक्षप्रवेश करणाऱ्या महिला उमेदवार यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पक्षातील निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळली.
यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करायच्या शेवटच्या दिवशी माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्ते व माजी नगरसेवकांसह सह प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉ.कुडमुलवार यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवून २० सदस्यांचे नामांकन दाखल केले. भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी डावलण्यात आलेले माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार हे मात्र प्रचार यंत्रणेत कुठेही सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाकडून तिकीट वाटपात निष्ठावंतावर झालेला अन्याय व ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांना दिलेली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी व गतकाळात केलेला विकास या जोरावर डॉ.कुडमुलवार हे शहरातील सर्वच प्रभागात कॉर्नर बैठका, प्रचार सभा, प्रचार रॅली घेत मतदारांचा कौल आपल्या बाजूने करण्यात यश मिळवले. सर्वच जाती धर्मातील मतदारांचा त्यात विशेष म्हणजे मुस्लिम मतदारांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा पाठिंबा मिळत असल्याने विरोधक धास्तावले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.यातच दि.२५ नोव्हेंबर रोजी शहरातील बाजार मैदान येथे माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर व आ.प्रताप पाटील चिखलीकर यांची पार पडलेल्या जाहीर सभेस मिळालेला प्रतिसाद पाहता नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीतील घटक पक्षात होणा-या लढतीत पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित अधिका-याच्या पत्नीला भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. भारतीय जनता पक्षासोबत वाळूमाफिया व व्याजाने पैसे देणारे लोक असल्याने तसेच भाजपने निष्ठावंतांना डावलून प्रभाव नसलेल्या लोकांना नगरसेवक पदाची तिकीट वाटल्याने शहरातील मतदारांमध्ये तीव्र संताप असून नगरपालिका निवडणुकीत शहरातील सुजाण मतदार विकासाच्या बाजूने मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर फडकवणार आहेत.असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांनी व्यक्त केला.



