ताज्या बातम्यानांदेडनायगांव

तहसीलच्या प्रांगणातील हायवा पळवणाऱ्या माफीयाला महसूलचा दणका : नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावलेला हायवा रात्रीच्या वेळी पळवून नेल्या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात चालक अजय देविदास मोरे व मालक लोकडो भगवान मोरे यांच्या विरुद्ध विवाह कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुजोरी करत हायवा पळवणाऱ्या माफीयांच्या विरुद्ध धाडसी पाऊल उचलत थेट गुन्हे नोंदवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

येळी ता.लोहा येथील गोदापात्रातून चोरीच्या रेतीची अवैध वाहतूक बरबडा मार्गे करण्यात येत असताना बरबडा येथील नागरिकांनी दि. 5 मार्च रोजी पकडून महसूल व पोलीस विभागाला माहिती दिली. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान बरबडा येथे पोहचले पण बऱ्याच वेळानंतर कुंटूर पोलीस पोहचले. महसूलचे अधिकारी उशिरा आल्याने तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला. या वेळी नागरिक आणि हायवा चालक व मालकात बाचाबाची झाल्याने एक हायवा चालकाने तेथून पळ काढला तर एम.एच. 26, बी ई 1614 या क्रमांकाचा हायवा पुढील कारवाई करण्यासाठी सायंकाळच्या दरम्यान नायगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आला.

रेतीच्या अवैध धंद्यातून मुजोर झालेल्या हायवा मालकाने रात्रीच्या वेळी मस्तखोरी करत थेट तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावलेली एम.एच. 26, बी ई 1614 या क्रमांकाची हायवा पळवली. मुजोरी दाखवत महसूल विभागाला आव्हान दिल्याने तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड यांनी या माफीयाची मुजोरी मोडीत काढण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी यांनी दि. 6 मार्च रोजी सायंकाळी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. चालक अजय देविदास मोरे व मालक लोकडो भगवान मोरे यांच्या विरोधात कलम 303(2), 3,(5) भारतीय न्याय संहिता व 47(7), 48(8) गौण खनिज अधिनिमानुसार गुन्हा नोंद केला आहे.

रेती माफीयाची मस्तखोरी मोडीत काढण्यासाठी तहसीलदारांनी धाडसी पाऊस उचलून थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याने एखच खळबळ तर उडालीच आहे. विशेष म्हणजे गुन्हा नोंदवलेल्या हायवा मालकाने अगोदर दोन बंधपत्र दिले असल्याची चर्चा होत असून या गुन्ह्यानंतर परिवहन विभागही कारवाई करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारल्यास हायवा भंगारात विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker