नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावर उलगडणार इतिहासाचे सुवर्णपान; शिवकालीन ‘होन’ आणि प्राचीन नाण्यांचे भव्य प्रदर्शन

प्रकाश कांबळे
नांदेड: जुन्या नांदेडमधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्यावर उद्या, शुक्रवार ३ एप्रिलपासून ऐतिहासिक आणि दुर्मिळ ठेव्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला अस्सल ‘सुवर्ण होन’, दोन हजार वर्षांपूर्वीची प्राचीन नाणी आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रे हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. ३ ते ५ एप्रिल २०२६ या दरम्यान चालणाऱ्या या प्रदर्शनामुळे नांदेडकरांना इतिहासाची प्रत्यक्ष प्रचिती येणार आहे.
प्रदर्शनाचे सविस्तर वेळापत्रक आणि मान्यवरांची उपस्थिती
१. सुवर्ण होन प्रदर्शन (शुक्रवार, ३ एप्रिल):
- उद्घाटन: सायंकाळी ५:०० वाजता.
- अध्यक्ष: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले.
- प्रमुख उपस्थिती: पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, इंटेकचे चेअरमन अशोकसिंघ ठाकूर.
२. प्राचीन नाणी प्रदर्शन (शनिवार, ४ एप्रिल):
- वेळ: सकाळी ११:०० वाजता (इ.स. पूर्व ६०० पासूनची नाणी).
- अध्यक्ष: माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण.
- प्रमुख अतिथी: आ. कु. श्रीजया चव्हाण (भोकर).
३. किल्ले छायाचित्र प्रदर्शन (शनिवार, ४ एप्रिल):
- वेळ: दुपारी ४:०० वाजता (महाराष्ट्र व कर्नाटकातील १२ ऐतिहासिक किल्ले).
- अध्यक्ष: आ. आनंदराव बोंढारकर.
- प्रमुख अतिथी: महापौर सौ. कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह राऊत.
४. समारोप समारंभ (रविवार, ५ एप्रिल):
- वेळ: दुपारी ४:०० वाजता.
- अध्यक्ष: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे.
- प्रमुख उपस्थिती: कुलगुरू मनोहर चासकर (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ).
नंदगिरी किल्ल्याचा कायापालट: नामशेष वास्तू ते पर्यटन स्थळ
अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगिरी किल्लेदार आणि नंदगिरी किल्ला संवर्धन संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून अहोरात्र कष्ट उपसले आहेत. एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या किल्ल्यावर दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवून त्याचे ऐतिहासिक महत्त्व जनमानसात रुजवले.
शासकीय मदतीचा हात: संवर्धन संस्थेच्या या प्रयत्नांची दखल घेत शासनाने किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी २९ लाख रुपये मंजूर केले आहेत. सध्या किल्ल्याचे नूतनीकरण प्रगतीपथावर असून, आगामी काळात हा किल्ला नांदेडमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास किल्लेदारांनी व्यक्त केला आहे.
नंदगिरी किल्लेदार व संवर्धन संस्थेच्या वतीने सर्व इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



