ट्रक्टर अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद : चालक व मालक अटकेत

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : तालुक्यातील आलेगाव येथील भिषण ट्रक्टर अपघात प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रक्टर मालक दगडोजी शिंदे व चालक नागेश आवटे यांना अटक करण्यात आली आहे. चालकावर निष्काळजीपणे ट्रक्टर चालवून सात महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ट्रक्टर चालकाच्या निष्काळजीपणे अपघात होवून सात मजूर महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती. सात महिलांच्या मृत्युमुळे वसमत तालुक्यातील गुंज गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर लिंबगाव पोलिसांनी तपासाची गती वाढवून कारवाई केली आहे. प्रकरणात ट्रॅक्टर मालक दगडोजी शिंदेच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर चालक नागेश आवटे याच्यावर निष्काळजीपणे त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हेड क्र. एमएच २६ बीएक्स ४४९३ वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी दोघांना शुक्रवारी रात्री अटक झाली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लिंबगाव पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक बोधनकर यांनी दिली. ट्रॅक्टर चालकाकडे वाहन परवाना नसल्याचीही माहिती आहे. दरम्यान सध्या गुंज गावात शोककळा पसरली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघातग्रस्त विहीर आणि ट्रॅक्टरची तांत्रिक तपासणी सुरू आहे.