बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास रामतीर्थच्या ठाणेदाराकडून टाळाटाळ

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे अन्यथा प्रभारी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षकांंनी दिला आहे. कारवाईचे स्पष्ट आदेश असतांनाही रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवून बदली झालेल्या पाच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास मागील अनेक महिण्यापासून टाळाटाळ करत आहेत.
रामतीर्थ पोलीस ठाण्यात मागील सात ते आठ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या मागच्या वर्षी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केल्या होत्या तर तेवढेच नवीन कर्मचारी रामतीर्थ पोलीस ठाण्याला दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्यानंतर बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेशही दिले होते. पण रामतीर्थ पोलीस ठाण्यातून बदली झालेल्या आठ कर्मचाऱ्यापैकी मनीषा वाघमारे (3287), केसराळीकर (358) आणि स्वामी(एलचसी) यांना कार्यमुक्त केले.
मात्र मागील सात ते आठ वर्षांपासून रामतीर्थ पोलीस ठाण्यात तळ ठोकून असलेल्या सुप्रिया दत्तात्रय मगर(101), व्यंकट बोडके ( 2538), संजय शिंदे (2167), हेड काँनिस्टेबल कोरके ( 2062) व शिवशंकर शिंदे (1371) यांना आजपर्यंत कार्यमुक्त केले नाही. दुसरीकडे इतर ठाण्यातून रामतीर्थ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलेले इजुलकुंटे (496), गोपनर (1456), रुद्रावाड (1801), येमेकर(2381), अखर्गे(637), काळे ( 832) आणि यरपलवाड (3207) अदि कर्मचारी रुजू झालेले आहेत.
नियमानुसार नवीन कर्मचारी रुजू झाल्यानंतर बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणे आवश्यक असताना रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश धाब्यावर बसवून आपल्या मर्जीतील वरील पाच कर्मचाऱ्यांना अद्यापही कार्यमुक्त केले नाही. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे असे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अनेवेळा दिल्यानंतरही रामतीर्थ ठाण्यातील त्या पाच कर्मचाऱ्यांना का कार्यमुक्त करण्यात आले नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाची पायमल्ली करुन त्या पाच कर्मचाऱ्यांना पाठबळ देत असल्याने त्यांच्या माध्यमातून जगताप यांना हवे असलेले काम तर करुन घेण्यात येत नाही ना अशी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दि. ३ एप्रिल रोजीही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे अन्यथा प्रभारी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याला रामतीर्थ पोलीस ठाण्याचे ठाणेदार किती गांभीर्याने घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.